Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्य सरकारचे अटकनाट्य

राज्य सरकारचे अटकनाट्य

अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)

दोन एक दिवसांपूर्वी ‘स्पायडरमॅन : नो वे होम’ हा इंग्रजी सिनेमा पाहायला गेलो होतो. एका अत्यंत उत्कंठावर्धक भागात एकाग्रतेने सिनेमा पाहत असताना त्यातील एका संवादाने लक्ष विचलित झाले आणि नजरेसमोर मा. मु. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा तरळली. सिनेमात नायकास कोळी कीटकाद्वारे सुपर पॉवर (नित्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण शक्ती) प्राप्त झालेली असते. जेव्हा याची प्रचिती घरातील वरिष्ठांना होते व त्याविषयी बोलताना ते म्हणतात ‘‘With Great Power Comes Great Responsibility’’ अर्थात वैशिष्ट्यपूर्ण शक्तीबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण जबाबदारीसुद्धा चालून येते.

सर्वसाधारण भाषेत बोलायचे झाल्यास, असे स्थान जेथून जनतेचे भवितव्य, आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त होते, जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त होते ती सुपर पॉवर. कर्म धर्म संयोगाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या रूपाने अशी शक्ती प्राप्त झाली, पण त्या शक्तीद्वारे चालून आलेली जबाबदारी पेलणे त्यांना शक्य होते आहे का? सुपर पॉवर ही दैवी, परंपरागत व घराणेशाहीद्वारे वा स्वकर्तृत्वानेसुद्धा प्राप्त होते. उद्धवजींच्या बाबत विचार करता ती घराणेशाहीद्वारे प्राप्त झाली आहे. अशी शक्ती जेव्हा घराणेशाहीद्वारे हस्तांतरित होत असते, तेव्हा आपोआपच जबाबदारी पेलण्याची क्षमता प्राप्त होतेच असे नाही.

उद्धवजी कोणत्याही चढाओढीशिवाय शिवसेना पक्षप्रमुख झाले. जबाबदारी पेलण्याची क्षमता असती, तर न्यायबुद्धीने वागणे उचित ठरले असते. पण तसे होताना दिसत नाही. खुशमस्करे यांच्यातच ते रमत गेले, अशांचीच सरशी, बोलती आणि उद्धवजींची मदार सुद्धा यांच्यावरच. प्रत्येकास संघटनेतील आणि सत्तेतील महत्त्वाची ५-६ पदे. त्यांचीच प्रगती, त्यांच्यामध्येच प्रगतीसाठी चढाओढ. चढाओढ ही कार्याची असावी, पण तसे न होता एकमेकांचे पाय ओढणे, वाभाडे काढणे, चहाड्या-चुगल्या करणे आणि आपला हेतू साध्य करणे. अशात शीर्ष नेतृत्व हलक्या कानांचे, कोत्या मनाचे असेल, तर बेबंदशाही माजणे निश्चित.

संजय राठोड यांच्या कुकृतीतून रिकाम्या झालेल्या मंत्रीपदासाठी स्वतःची वर्णी लागावी म्हणून संघटनेतील काही ठरावीक इच्छुक आमदारांमध्ये, कोणात सर्वाधिक भाटगिरी, खुशमस्करी आणि विरोधकांवर विक्षिप्त अंगचाळे, अर्वाच्च, गलिच्छ भाषा या चढाओढीस ऊत आला आहे. विधानसभा अधिवेशनात ‘म्यांव – म्यांव’ या नितेश राणे यांच्या सहज केलेल्या वक्तव्यावर थेट टोकाची भूमिका मांडत अटकेची मागणी करून झालेली आदळआपट ही त्याचीच परिणती आहे. सामान्यतः सर्वच शिवसेना आमदारांचा विचार करता त्यांची स्थिती, मानसिक कुत्तर ओढीतून स्फुल्लिंगे अनेकदा विझून जातात, हुशार मनुष्यबळ वाया जाते, अशांसारखी झालेली आहे.

२५ – ३० वर्षे मुंबई मनपा आणि आता राज्याची सत्ता शिवसेनेच्या हाती आहे. भावनिक आव्हान करून मराठी माणसांची मते मिळवण्याचे कर्म आपण केले, पण कर्तव्य म्हणून आपण त्यांच्यासाठी काय केले? मुंबईतून मराठी माणूस परागंदा झाला, मुंबईत अल्पसंख्य झाला. या पापाचे धनी कोण? लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ आणि सामान्य शिवसैनिक यांच्यातील असमतोलतेने अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे. अशातूनच प्रत्येकाच्या मनात खदखद सुरू होते. त्याचे रूपांतर कुजबुजीत होते. पुढे जाहीरपणे होत जाते. अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धवजींच्या विश्वासातील अनिल परब यांच्यावर डागलेली तोफ अथवा सरकारच्या पक्षनिहाय निधी वाटपात सर्वात कमी निधी स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या वाट्यास आले. यावरून स्वपक्षीयांनी जाहीरपणे केलेली आगपाखड. अशी एक ना अनेक उदाहरणे सांगता येतील. आज शिवसेना पक्षाचा पक्षप्रमुख कोण? जो उठतो तो निर्णय जाहीर करतो. पक्षात सर्वच बजबजपुरी.

उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, पण प्रशासनावर त्यांचा वचक आहे का? त्यांच्याच मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यावर त्यांचा दरारा आहे का? जो तो स्वतःच मुख्यमंत्री असल्यासारखा वागतो आहे की नाही? महाविकास आघाडीतील मोकाट सुटलेल्या आमदारावर त्यांना आवर घालता आला आहे का? महाविकास आघाडीतील तीनही पक्षात सर्व काही आलबेल आहे, असे आपण छातीठोकपणे सांगू शकता का? असे जर असते तर सरकारला वसुली सरकार म्हणून जनमान्यता मिळाली असती का? कोरोना कालावधीत झालेला भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्ट्याबोळ, पोलीस खात्यातील विस्कळीतपणा, आरोग्य, शिक्षक, म्हाडा, पोलीस इत्यादी खात्यांच्या पेपरफुटीचा प्रकार, संबंधितांकडून करोडो रुपये रोख, सोने-चांदी, जमीनजुमला जप्त आणि त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचणे अशा घृणास्पद घटनांवर न्यायालयाने ओढलेले ताशेरे. इतकेच काय महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्याशी अहंगंडातून झालेला पराकोटीचा विसंवाद, केंद्र सरकारशी नाहक घेतलेले शत्रुत्व आणि महाविकास आघाडीतील एका पक्षाचे प्रमुख यांच्या केवळ नाराजीची किंमत निव्वळ २.५० कोटी अशी बोली लागते. याहून लज्जास्पद गोष्ट काय असू शकते? आपणास विचारायला प्रश्न असंख्य पण एकाचेही उत्तर मिळणे अशक्य.

कोण हो हे आदित्य ठाकरे ज्यांच्याविषयी सर्वसाधारण विचार व्यक्त करणे म्हणजे राजद्रोह ठरतो? बाळहट्टासाठी नितेश राणे यांचे अटकनाट्य घडवून आणत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यास वेठीस धरून, त्यास छावणीचे स्वरूप देऊन, अंमलबजावणीही सुरू झाली. उद्धवजी आपल्यातील अहंकार प्रचंड प्रमाणावर बळावत चालला आहे. खरे तर आपण ज्या शीर्षस्थ पदावर विराजमान आहात, तेथे आपणाकडून प्रयत्नपूर्व अहंकारावर मात करणे अपेक्षित आहे. पुत्रप्रेमातून नितेश राणे यांना अटक करण्याचा अट्टहास आपण करत आहात. स्वार्थासाठी खुशमस्करे – भाट, आपण देशात ‘बेश्ट सीएम’ अशी साखर पेरणी करत आपणावर स्तुतिसुमने उधळतील आणि आपण त्यास बळी पडाल, अशी दयनीय परिस्थिती आपणास अशोभनीय ठरेल. नारायण राणे काय, मी स्वतः अरुण बेतकेकर वा नितेश राणे काय आम्ही रणांगणात उतरून शिवसेनेसाठी झुंजणारे कार्यकर्ते. आम्ही केसेस घेतल्या, अटक झाली, पोलीस कोठडी अनुभवली. कोणत्याही वेळी अशा प्रसंगी सामोरे जाण्याचे धारिष्ट्य व मानसिकता आजही आमच्यात आहे. उद्धवजी, कंगना रणौतचे ‘समय का पहिया’ याचे स्मरण व्हावे.

आजचे आपले विरोधी पुढे सत्तेत येतील व अशीच पाळी जेव्हा आपल्यावर येईल तेव्हा आपल्यासारख्या व आपले सुपुत्र आदित्यजीसारख्या सुखवस्तू उच्चभ्रू जीवन जगलेले, जीवनात कधीही कठीण परिस्थितीस सामोरे न गेलेले यांच्यावर आल्यास त्यास क्षणभरही आपण सामोरे जाऊ शकणार नाही. अंगलट येतील असे कटू निर्णय घेण्यापूर्वी न्यायबुद्धी जीवित राखा. नियती कोणासही सोडत नाही. एकत्र आलेल्या बदमाशांच्या सत्तेत, ‘तुमच्यासह काही अडचण नाही, अन् तुमच्याविना काही अडत नाही; पण कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तुम्हीच मामू म्हणून हवेत,’ अशी भावना निर्माण होणे हा आपला सर्वात मोठा पराजय आहे. ‘With Great Power Comes Great Responsibility’ या सुरुवातीस उल्लेखलेल्या वाक्यानुसार उद्धवजी उतरले आहेत का? याचा अन्वयार्थ वाचकांनी काढावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -