Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमी‘दर्पण’कार जांभेकर यांना आठवताना…

‘दर्पण’कार जांभेकर यांना आठवताना…

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी, १८३२ हा दिवस एक वेगळे महत्त्व असलेला आहे. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ या दिवशी सुरू झाले. त्यामुळे हा दिवस आपण ‘मराठी पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा करतो. याचे मुख्य संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. पुढे प्रभाकर (१८४१), मित्रोदय (१८४४) मराठी वृत्तपत्र म्हणून विशेष ठसा उमटवणारे ज्ञानप्रकाश(१८४९), इंदुप्रकाश, ज्ञानसिंधू, विचार लहरी, असे करत हा टप्पा ‘केसरी’पर्यंत येऊन पोहोचतो. लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले. पुढे आगरकर, भोपटकर, परांजपे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खाडिलकर यांनी समता, बंधुभाव, स्वावलंबन, सहिष्णूता यांची पेरणी केली. आचार्य अत्रे, तळवळकर, महाजनी, पा. वा. गाडगीळ, नानासाहेब परुळेकर यांनी पुढे समाज सजग व्हावा आणि त्यातून ज्ञानवंत व्हावा, आधुनिक व्हावा हा वसा घेऊन मराठी वृत्तपत्रांची प्रतिष्ठा जपली.

दीडशे-पावणे दोनशे वर्षांचा सातत्यपूर्ण इतिहास असलेल्या वृत्तपत्र क्षेत्रात व्रत म्हणून सुरू झालेला हा प्रवास एक सन्माननीय पेशा या रूपातही आपण पाहिला. १९९०-९१च्या जागतिकीकरणाच्या रेट्यात त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाऊ लागले. पण गेल्या १५-२० वर्षांमध्ये याचे स्वरूप हे गळेकापू स्पर्धा करत बाजारशरण झालेले दिसते. काही सन्माननीय वृत्तपत्रे वगळता आजची वृत्तपत्रे ही जाहिरातपत्रे झाली आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

अर्थात जाहिराती हा वृत्तपत्रांचा प्राणवायू झाला आहे, हे आजचे वास्तव पाहता मान्य करावे लागेल. कारण, ४-५ रुपयांत मिळणाऱ्या वृत्तपत्राच्या एका प्रतीच्या निर्मितीचा खर्च २०-२५ रुपयांच्या घरात गेला आहे. अशा वेळी जास्तीत-जास्त जाहिराती मिळवून वृत्तपत्रे आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. बहुतांशी वृत्तपत्रे वाचकांकडे एक समाज घटक म्हणून न पाहता ग्राहक म्हणून पाहायला लागली आहेत. पण याचा सर्वस्वी दोष वृत्तपत्रांना देता येणार नाही. वाचक म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण करण्यात आपण कमी पडतो आहोत. मुख्यत्वे वर्गणीदारांवर वृत्तपत्र चालायला हवे, जाहिरातीचा टेकू कमीत-कमी असावा असे वातावरण तयार करण्याची अंकाच्या निर्मितीची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एक जबाबदार वाचक म्हणून वृत्तपत्रांमधील त्रुटी, चुका यांबद्दल आपण जेवढे सजग असयला हवे तेवढे आपण नाही आहोत. वाचकपत्रे लिहिणारी काही मंडळी सोडली, तर बहुसंख्य मंडळी सकाळच्या चहाच्या कपाबरोबर चघळायचे बिस्कीट या पलीकडे वर्तमानपत्राकडे पाहात नाहीत.

आज वास्तव असे आहे की, वृत्तपत्रे ही याच्या किंवा त्याच्या बाजूची झाली आहेत. सत्याच्या बाजूची, घटनेच्या गाभाघटकाचा आदर करणारी पत्रकारिता आता दुर्मीळ होऊ लागली आहे. या साऱ्याचे मूळ कारण आर्थिक आहे. बातमी ही स्फटिकासारखी स्वच्छ असावी. पण आज ती, कोणते ना कोणते रंग घेऊन वाचकांच्या पुढ्यात येत आहे. व्यासंग करून बातमीला डौलदार करावे, असा ध्यास कमी होताना दिसतो आहे. पूर्वी सत्याचा दाखला देण्यासाठी वृत्तपत्रे संदर्भ म्हणून वापरली जायची. आज कावळ्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या वृत्तवाहिन्यांचा संदर्भ घेऊन बातम्या लिहिल्या जाताहेत. या वाहिन्यांच्या आक्रमक बाह्या सरसावणाऱ्या शैलीची कृष्णछाया वृत्तपत्रांवर पडताना दिसत आहे.
अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेत.

आजही काही मोजकी वृत्तपत्रे रास्ता रोको, काम बंद अशा नकारात्मक गोष्टीचे वृतांकन करतानाही प्रेरणा देणारी, मार्ग काढणारी, समाज प्रबोधन करणारी पत्रकारिता करताना दिसत आहेत. शोषित, पीडित मंडळींसाठी, स्त्रियांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. समाजातील विसंवाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. खरे म्हणजे हाच आपला वारसा आहे. हीच आपली वृत्ती आहे. हीच वाढीस लावू या. बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’मध्ये आपला मूळ चेहरा नीट निरखून पाहू या !

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -