नवीन पनवेल : पत्रकार दिनाच्या निमित्ताने आणि ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप केले. तसेच गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक नैपुण्य प्राप्त केलेल्या मंचातील सदस्यांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला.
मराठी वृत्तपत्र क्षेत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मंचाचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. या वेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या, पेन असे शैक्षणिक साहित्य तसेच टूथपेस्ट, टूथब्रश, मास्क असे स्वच्छता किट आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना माधव पाटील म्हणाले की, ‘‘पनवेल तालुका पत्रकार विकास मंच हा सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे. दर वर्षी नित्यनेमाने दुर्गम ग्रामीण विभागातील मुलांना आम्ही शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप करत असतो. सत्कार समारंभ आणि पुरस्कारांचे नेत्रदीपक सोहळे आयोजित करण्यापेक्षा दुर्गम ग्रामीण विभागात जाऊन, तेथील लोकांच्यात उतरून त्यांच्यात मिळून मिसळून काम करण्यात खरा आनंद प्राप्त होतो. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यातील प्रत्येक सदस्य एखाद्या क्रिकेट टीमसारखे सहभागी होत असतात. प्रत्येक सदस्याचे योगदान असते. सर्वत्र माझ्या नावाचा गवगवा होत असला तरीदेखील मी नाममात्र कर्णधार आहे. खरी मेहनत ही मंचातल्या प्रत्येक सदस्याची आहे.’’
कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून भोकरपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष माधव पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, उपाध्यक्ष हरेश साठे, खजिनदार नितिन फडकर, विवेक मोरेश्वर पाटील, संजय कदम, अविनाश कोळी, अनिल कुरघोडे, अनिल भोळे, राजेंद्र पाटील, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, मयूर तांबडे, भरत कुमार कांबळे, सुनील राठोड, स्वर्गीय बाबू हशा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय पाटील, खजिनदार रुपेश फुलोरे, कल्पेश फुलोरे, हनुमान फुलोरे, किशोर फुलोरे, शिक्षिका समृद्धी सुधीर पाटील, प्रकाश राजगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण मोहोकार यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.