कुडूस :तालुक्यातील कुडूस विभागातील दुध डेअरी व दुध उत्पादक शेतकरी संघटीत होऊन स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. कुडूस येथे गुरुवारी सायंकाळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व तालुकाध्यक्ष रवींद्र मेणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुध डेअरी व दुध उत्पादक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुडूस विभागातील ४२ दूध उत्पादक शेतकरी हे स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी दुध उत्पादक व दुध डेअरी हा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. हा व्यवसाय करत असतांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे. कोरोनाच्या कठीण काळात हजारो लिटर दूध वाया गेले. अवकाळी पावसामुळे जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा भिजून पूर्णता वाया गेला. तर जनावरांचे खाद्य महागले असल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आम्ही या संघटनेचे सदस्यत्व स्विकारले असल्याचे उपस्थितीत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.