Friday, July 11, 2025

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे धुळीचा त्रास

लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे लांजा शहरातील व्यापारी, नागरिक, वाहन चालक, प्रवासी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. धुळीने आजारही होण्याची शक्यता असून अर्धवट स्थितीत असलेले काम येत्या ८ दिवसांत सुरू न झाल्यास महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा लांजा नगरपंचायतीच्या नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी ६ जानेवारी रोजी लांजा तहसीलदार तसेच आमदार राजन साळवी यांना सादर करण्यात आले.

तीन वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. लांजा शहरामध्ये महामार्गाची बिकट अवस्था झाली असून संबधित खात्याकडून महामार्ग कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे. याबाबत नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये यांनी आमदार राजन साळवी तसेच लांजा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील कुक्कुटपालन, बसवेश्वर चौक, बाजारपेठ या ठिकाणी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गावरून समोरून वाहन गेल्यास समोरील वाहन चालकांना व नागरिकांना दिसत नाही.

महामार्गावरील धुरळ्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असलेले व्यापारीवर्ग धुळीने त्रस्त होत आहेत. दुकाने व शेजारील हॉटेलवर प्रचंड धुळीचे लोट बसत आहेत. लांजा शहरातील अर्धवट ठप्प पडलेल्या महामार्गाच्या कामामुळे शहरवासीय, प्रवासी, वाहन चालक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अर्धवट कामांमुळे छोटे अपघातही घडलेले आहेत.
या सर्व प्रकारची दखल घेऊन येत्या आठ दिवसांत महामार्गाचे ठप्प पडलेले काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी दुर्वा भाईशेट्ये यांनी केली असून सुरुवात न केल्यास महामार्गावर चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
Comments
Add Comment