Saturday, May 10, 2025

विदेशमहत्वाची बातमी

ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका

ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका

नवी दिल्ली : जगभरात पसरलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी मात्र ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका, असा इशारा दिला आहे.


ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग फैलावत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचे सांगितले. ओमायक्रॉन केसेसची त्सुनामी इतकी मोठी आणि जलद आहे की जगभरातील आरोग्य यंत्रणांवरील बोझा वाढला आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ९० लाख ५ हजार रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. ही वाढ तब्बल ७१ टक्क्यांची आहे, असे ते म्हणाले.


“ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचे दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावे असा होत नाही,” असेही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.


“मागील अनेक व्हेरियंटप्रमाणे ओमायक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


टेड्रोस यांनी श्रीमंत देशांकडून लसींचा जास्तीत जास्त साठा घेतला जात असल्याने नाराजी जाहीर केली असून किमान २०२२ मध्ये तरी लसींचे योग्य वाटप व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment