कर्जत –(प्रतिनिधी) कर्जतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या ४४ व्या श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी १४ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात गर्दी टाळण्यासाठी प्रवचन, कीर्तन, भजन होणार नसून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पारायण व हरिपाठ होणार आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने अखंड हरिनाम सप्ताह खुल्या मैदानात न घेता कर्जतमधील श्री माऊली निवास येथे घेण्यात आला आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी पहाटे कर्जतमधील सर्व स्थानिक देवतांना तसेच मशिद, बोहरी मशीद या ठिकाणी स्थानिक यजमानांच्या हस्ते पूजा आणि प्रार्थना करून सप्ताहासाठी आवाहन करण्यात आले. नंतर पहाटे ४ वाजता श्री माऊलींना महाभिषेक आणि षोडशोपचारे महापूजन करण्यात आले. श्री माऊलींना श्री कपालेश्वर मंदिरात नेण्यात आले. श्री कपालेश्वर मंदिरातून श्री माऊलींना श्री माऊली निवास येथे आणण्यात आले.