Friday, October 11, 2024
Homeक्रीडाजेमिमा रॉड्रिग्जसह शिखा पांडेला डच्चू

जेमिमा रॉड्रिग्जसह शिखा पांडेला डच्चू

महिला वनडे वर्ल्डकपसाठी भारताच्या संघाची घोषणा

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतून मुंबईची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, हरलीन देओल, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती यांना वगळण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारताच्या संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली.

अनुभवी मिताली राजच्या नेतृत्वाखाली १५सदस्यीय संघात हरमनप्रीत कौरकडे उपकर्णधार सोपवण्यात आले आहे. रिचा घोष आणि तानिया भाटिया यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमधील चमकदार खेळानंतर जेमिमाला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. भारताच्या संघात सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर यांचा राखीव खेळाडू समावेश आहे. यंदाचा वर्ल्डकप ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ या कालावधीत रंगेल.

महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ६ मार्च २०२२ रोजी पाकिस्तान विरुद्ध टोरँगा येथे होणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननंतर भारताला न्यूझीलंड (१० मार्च), वेस्ट इंडिज (१२ मार्च), इंग्लंड (१६ मार्च), ऑस्ट्रेलिया (१९ मार्च), बांगलादेश (२२ मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (२७ मार्च) या संघांशी दोन हात करायचे आहेत.

वर्ल्डकपपूर्वी भारत यजमानांशी खेळेल वनडे मालिका

विश्वचषकापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. ही मालिका ११ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. यामध्ये पाच सामने होणार आहेत. वनडे मालिका २४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एक सामना नेपियरमध्ये आणि नेल्सन आणि क्वीन्सटाऊनमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळवले जातील.

आयसीसी वर्ल्डकप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मान्धना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव. राखीव : सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर.

न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला यजमान संघाविरुद्ध टी-ट्वेन्टी सामनाही खेळणार आहे. हा सामना ९ फेब्रुवारी रोजी होईल. त्यासाठी संघही जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली या सामन्यासाठी १६ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. एकमेव टी-ट्वेन्टी सामन्यासाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मान्धना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड. पूनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना आणि सिमरन दिल बहादूर.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -