Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

८० टक्के खाटा ११ जानेवारीपर्यंत ताब्यात द्या!

८० टक्के खाटा ११ जानेवारीपर्यंत ताब्यात द्या! मुंबई  : मुंबईमध्ये कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होममधील ८० टक्के खाटा ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात द्या, असे आदेश पालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत. मुंबईमध्ये डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढली आहे. २१ डिसेंबरपासून ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसभरातील ९० टक्के रुग्ण इमारतीमधून आढळून येत आहेत. रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण लक्षणे असलेले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुसऱ्या लाटेदरम्यान ५ मे २०२१ रोजी प्रमाणे ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात खाटा देण्याच्या सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. खासगी रुग्णालये, नर्सिंग होममधील ८० टक्के खाटा आणि १०० टक्के आयसीयू खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात. खाटांवर कोविड रुग्णांना भरती करण्यासाठी पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या सल्ल्यानुसार भरती करावे. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णांकडून बिल घ्यावे. सर्व रुग्णालयांनी लागणारी औषधे, ऑक्सिजन, पीपीई किट, मास्क, उपकरणे यासह सज्ज राहावे असे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment