जीआपल्या अद्वितीय म्हणाव्या अशा उत्तुंग कामगिरीमुळे चालती – बोलती दंतकथा बनलेल्या आणि शेकडो अनाथ, निराधार जीवांना आपल्या मायेच्या पदराखाली घेत, त्यांना आधार देत स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या आणि त्यांची ‘माय’ झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या महाराष्ट्रावर जणू शोकसागर कोसळला. त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा येथे बुधवारी दुपारी १२ वाजता शासकीय इतमामात महानुभाव पंथीयांच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे कन्या ममता, नातेवाईक सुरेश वैराळकर यांच्यासह भला मोठा अनाथांचा परिवार आहे. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई गेल्या दीड महिन्यांपासून गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
‘माझी मुलं कशी आहेत? त्यांना व्यवस्थित सांभाळा. त्यांची परवड होऊ देऊ नका!’ हे माईंचे अखेरचे उद्गार. शेवटपर्यंत त्या आपल्या मुलांचाच विचार करीत होत्या. विशेष म्हणजे त्या ज्या मुलांचा सतत विचार करीत होत्या ती एक, दोन नव्हे तर हजारो मुले असून ती त्यांची सख्खी अशी कोणीच नसून आपल्या समाजात ज्यांना अनाथ म्हणून दुर्लक्षिले गेले किंवा परिस्थितीमुळे जी अनाथ बनली अशा कित्येक अनाथांच्या सिंधुताई या चक्क ‘नाथ’ बनल्या होत्या. सिंधुताई सपकाळ यांना ‘मदर ऑफ अनाथ’ म्हणूनही ओळखले जाते. अनाथ मुलांच्या संगोपनासाठीच्या त्यांच्या कामासाठी त्या ओळखल्या जातात. लहानपणीचे टोपणनाव ‘चिंदी’ म्हणजे फाटलेले कापड. त्यामुळे तिला नको असलेले मूल असे नाव ठेवण्यात आले होते.
या घटनेचा त्यांच्या मनावर खूप विपरित परिणाम झाला आणि त्यावेळी त्यांनी आत्महत्या करण्याचा विचारही केला. पण नंतर तो विचार सोडून दिला आणि आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी व अन्नासाठी त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर चक्क भीक मागू लागल्या. दररोज अन्नासाठी भीक मागायला सुरुवात केली आणि जगण्याची लढाई सुरू केली, तेव्हा त्यांना समजले की, आपल्या आजूबाजूला बरीच अनाथ मुले त्यांच्या पालकांनी सोडून दिलेली आहेत व ज्यांना योग्य काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. हीच गोष्ट त्यांना अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी या शेकडो अनाथांना मायेची पाखर देण्याचे महत्कार्य सुरू केले.
सिंधुताईंचा निर्णय खूप कठीण होता. पण प्रचंड मेहनत, दुर्दम्य आशावाद या बळावर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या तुटलेल्या, दुभंगलेल्या हृदयाचे तुकडे उचलून पुन्हा एकत्र करण्यासाठी वेचले. प्रेमाने ‘माई’ आणि ‘अनाथांची आई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताईंचे आयुष्य म्हणजे नुसता संघर्ष, दु:ख, कष्ट आणि मती भ्रष्ट करणारी संकटांची मालिका असेच होते. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. त्यांचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. हा लढा त्या जिंकल्या, पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करण्यात आला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून त्या मरतील म्हणून अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.
अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या. पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून त्या मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. दिवसभर पोट भरून भीक मागायची आणि रात्री स्वत: आणि मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानभूमी गाठायची. त्यांच्या या संघर्षात त्यांना समजले की, देशात अशी अनेक अनाथ बाळे आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले की, जे कोणी अनाथ त्यांच्याकडे येईल, त्याची त्या आई होतील. सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथांना समर्पित केले आहे. म्हणून तिला ‘माई’ (आई) म्हणत. त्यांनी १०५० अनाथांना दत्तक घेतले आहे.
आज त्यांच्या कुटुंबात त्यांना २०७ जावई आणि ३६ सुना आहेत. येथे १००० हून अधिक नातवंडे आहेत. त्याची स्वतःची मुलगी एक वकील आहे आणि आज दत्तक घेतलेली बरीच मुले डॉक्टर, अभियंते, वकील आहेत आणि त्यांच्यापैकी बरेचजण स्वत:चे अनाथाश्रमही चालवतात. सिंधुताई यांना एकूण २७३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सिंधुताई यांनी आपल्या संस्थांच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने देश-विदेशी दौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या वक्तव्याने, शेरो-शायरीयुक्त ओघवत्या वाणीने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. एक अशिक्षित, एकाकी आयुष्य जगणाऱ्या माईंची ही कहाणी मती गुंग करणारी, थक्क करणारी आणि तितकीच प्रेरणादायी अशी म्हणावी लागेल. त्यांच्या अकस्मात जाण्याने आज हजारो अनाथ पोरके
झाले आहेत.