
अनिकेत देशमुख
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर छत्री लावण्याची मागणी, शिव भक्त मीरा - भाईंदर मराठा संघाचे कार्यध्यक्ष मनोज राणे यांनी केली आहे.
मीरा-भाईंदर शहरात काशिमीरा नाका येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असून मीरा-भाईंदर शहराची शान आहे. दरम्यान पुतळ्याच्या देखरेखीकरिता पालिकेने एकतरी सुरक्षा रक्षक ठेवायला हवा अशी मागणीही होत आहे.
शहारातील शिवप्रेमी, भक्त, पालिका, समाजसेवक, नेतेमंडळी महाराजांच्या पुतळ्याची काळजी घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी असून पुतळ्यावर पडणाऱ्या धुळी व घाणीपासून त्यांचा बचाव करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली नाही. पालिकेने कमीत कमी इतक्या वर्षात महाराजांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या पुतळ्यावर एक छत्री लावण्यात यायला हवी होती, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर आकाशात उडणाऱ्या पक्षांची घाण पडणार नाही व पुतळ्यांच्या अपमान देखील होणार नाही व घाणीपासून पुतळा सुरक्षित व स्वच्छ राहील.
पुतळ्याच्या आवारात त्या ठिकाणी दारुडे, गर्दुल्याचा वावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो व महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात बसून नशेचे सेवन केले जात असून त्याच ठिकाणी त्यांनी आपल्या निवाऱ्याची सोय देखील केल्याचे दिसून येत असल्याने दारुडे व गर्दुले यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अवमान केला जात आहे. एवढे सर्व होत असून देखील पोलीस प्रशासन व मीरा भाईंदर महानगर पालिका बघ्याची भूमिका घेत आहे.
मीरा-भाईंदर शहरात राहणारे शिव भक्त रवींद्र राजाराम भोसले (मराठी शिलेदार, मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य) यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा निषेध करत मीरा-भाईंदर शहरात राहणाऱ्या सर्व लोकांपर्यत ही गोष्ट व्हिडियो मार्फत पोहचवण्याचा प्रयत्न केला होता.
महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती पालीकेमार्फत मोठमोठ्या हेलोजन लाइट लावण्यात आल्या आहेत. मात्र त्या लाइट अनेकदा बंद अवस्थेत आढळून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे दिसत आहे. महाराजांना मानवंदना देण्यासाठी शहरातील अनेक मान्यवर पुष्पहार घालण्याकरिता गर्दी करतात, पण महाराजांच्या पुतळ्यावर सुरक्षेकरिता छत्री किंवा छत लावण्याकडे विसर पडला असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान विकास फाळके व पंकज दुबे यांनी देखील महाराजांच्या पुतळ्यावर छत्री असावी अशी इच्छा दर्शवली आहे.