मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिवांची त्यांनी भेट घेतली असून राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईतील लोकलच्या गर्दीवर चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हे निर्बंध कसे असतील याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नसून लोकलबाबतच्या निर्बंधांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे.
काल मुंबई मध्ये एकूण १५ हजार १६६ रुग्ण आढळून आल्याने लोकल प्रवासावर राज्य सरकार निर्बंध लावणार का याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष आहे. अनेक प्रवासी हे कामानिमित्त मुंबईकडे जात असतात. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जाते. याच आधारावर मुंबईत रेल्वेने प्रवास करण्यासाठी निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यापैकी दोन डोस घेतलेल्यांना तूर्तास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांना सर्दी-पडसे, खोकला आणि ताप येत आहे. त्यातच लोक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. लोकलमधूनही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असून अनेकजण तर मास्कशिवायच वावरताना दिसत आहेत. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. त्यातच सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांमुळे इतरांनाही संसर्ग होताना दिसत आहे.
नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र कोणीही जुमानत नसल्यामुळेच काही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत सध्या २० सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. तर मुंबईतील ४६२ इमारती सीलबंद आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली.
दरम्यान, मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही असे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही, अशी माहिती दिली. तसेच तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार केला.