महापालिकेच्या परवानगीशिवाय कोविड रुग्णाला दाखल करु नका
खासगी रुग्णालयांनी सरकारने निश्चित केलेले दरच आकारावेत
मुंबई : मुंबईत दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येचा धोका पाहता मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात बेड्स उपलब्ध होते तितक्या बेडची व्यवस्था पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. बुधवारी एकाच दिवसांत कोरोनाचे १५ हजारहुन अधिक रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
ज्या रुग्णांना याआधीच आजार आहे आणि त्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करुन घ्या. जर रुग्णालयात आधीच पेशंट दाखल असतील आणि बेडची कमतरता भासत असेल तर त्यांची परिस्थिती पाहून ३ दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात यावे. महापालिकेने सांगितले आहे की, रुग्णालयाने ८० टक्के कोविड बेड आणि १०० आयसीयू वॉर्ड रुम उघडावेत. महापालिकेच्या परवानगीशिवाय कुठल्याही रुग्णाला हे बेड देऊ नये. त्याचसोबत सर्व रुग्णालयांनी सरकारने निश्चित केलेले दरच आकारावेत. यामुळे सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये कुठल्याही कोविड रुग्णाला दाखल करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.
इमारत सील करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा
इमारत सील करण्याच्या नियमांमध्ये महापालिकेने सुधारणा केली आहे. बीएमसीच्या नव्या नियमांनुसार, कुठल्याही इमारतीच्या विंग, कॉम्प्लेक्स अथवा सोसायटीच्या एकूण फ्लॅटच्या २० टक्के फ्लॅटमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. नव्या नियमावलीप्रमाणे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांना १० दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक आहे.
इमारत सील करण्याची प्रक्रिया
हायरिस्क असणाऱ्या लोकांना ७ दिवस विलिगीकरणात राहणे गरजेचे आहे. ५ व्या अथवा ७ व्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागेल. सोसायटीमधील व्यवस्थापन कमिटी कोरोनाबाधित कुटुंबाला रेशन, औषधं आणि अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देतील. इमारत सील करण्याची प्रक्रिया वार्डस्तरावर राबवण्यात येईल.
कोरोनाबाबत मेडिकल ऑफिसर आणि वार्ड ऑफिसद्वारे जारी करण्यात आलेल्या कोविड नियमांचे नागरिकांना पालन करावे लागेल. मुंबईत झोपडपट्टीहून अधिक कोरोनाबाधित इमारतीत सापडत असल्याने मुंबई महापालिकेने या नियमांत सुधारणा केली आहे.






