मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रूग्णालयात भरती होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मुंबईत आजच्या घडीला ८० टक्के बेड रिकामे असल्याचे सांगत ते म्हणाले की, ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झालेली नाही. त्यामुळे जनतेने घाबरु नये, असा दिलासा देत कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.
देशासह राज्यात कोरोना बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या नक्कीच झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, जरी कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी, त्यातील अनेकांना अगदी सैम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्याशिवाय ज्याप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड आणि ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात होती. तशी परिस्थिती आता नक्कीच नाही. ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील ७० ते ८० लाख लोकांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला दोस घेतलेला नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील कोरोना लसीकरणाच्या वेग वाढविण्यावर जोर देण्यात असून १० तारखेनंतर प्रिकोशनरी डोस, बुस्टर डोस कशा पद्धतीने देणार, याबाबतची माहिती देखील शरद पवार यांनी घेतली. त्याशिवाय औषध, निर्बंध यावर चर्चा झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतली असे टोपे यांनी यावेऴी सांगितले. कौटुंबिक कार्यक्रमांवर कडक नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी, असे मत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.