Tuesday, November 12, 2024
Homeमहत्वाची बातमीअनाथांच्या मायेची सावली

अनाथांच्या मायेची सावली

उर्मिला राजोपाध्ये

आपबितीतून सिंधुताईंनी अनेक संस्था उभारल्या. सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन संस्था (पुणे), सन्मती बालनिकेतन संस्था (पुणे), वनवासी गोपाल कला शिक्षण व क्रीडा मंडळ (चिखलदरा), अभिमान बालभवन, ममता बाल सदन अनाथाश्रम अशा अनेक संस्थांचा संसार चालवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं समाजमन सुन्न झालं असून अनाथांची माय हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सिंधुताई सपकाळ यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षानं ओतप्रोत भरलेलं होतं. चौथीपर्यंत शिकलेली बाई एवढं पाठांतर करू शकते, इतक्या कविता करू शकते यावर विश्वास बसणंच कठीण आहे.

पुणे विद्यापीठानं त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला, तेव्हा अनेक विद्वतजन उपस्थित होते. माईंनी त्या सर्वांना जिंकून घेतलं. त्यांचं ओघवतं भाषण म्हणजे पाठांतर नसायचं, तर मनाच्या खोल गाभ्यातून आलेले वेदनेचे हुंकार असायचे. डॉ. नरेंद्र जाधव यांना थेट हसत हसत ‘‘आमचा बाप आणि आम्ही’ लिहिलंस बाबा; परंतु मायची आठवण ठेवत जा रे लेकरा’ असं सांगण्याचं धारिष्ट्य सिंधुताईंकडे होतं. ‘ममता बाल सदन’ सुरू केलं, तेव्हा त्यांना सरकारी मदत मिळत नव्हती. मुलं कशी जगवायची, असा प्रश्न त्यांना पडत होता. त्या वेळीही अमोघ वाणीच त्यांच्या कामाला आली. भाषणानं आणि त्यानंतर अंथरलेल्या पदरानं किती मुलांना मायेची सावली दिली, या फक्त सिंधुताईच जाणोत. अश्रूंत किती ताकद असते, हे सिंधुताईंनी वारंवार दाखवून दिलं. गेली ४० वर्षं त्या सामाजिक कार्य करत होत्या. आजवर त्यांना ७५०पेक्षा अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई ‘मी हजारहून अधिक मुलांची आई आहे,’ असं अभिमानानं सांगत. कुणालाही भेटल्या तरी त्या त्याचा उल्लेख ‘लेकरा’, ‘बाळा’ असाच करत. त्यामुळे भेटणारी व्यक्ती सिंधुताईंना कायम लक्षात ठेवायची.
अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या सिंधुताईंचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. सिंधुताईंना शिक्षणाची आवड असली तरी शिकता आलं नव्हतं. मग बालपणी आलेल्या अनुभवांमुळे अनाथ मुलांच्या जीवनातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी एक संस्था सुरू केली. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी असलेल्या ‘ममता बाल सदन’ या संस्थेच्या माध्यमातून सिंधुताई अनाथ आणि गरजू मुलांना मदतीचा हात देत राहिल्या.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सासरी होणारा छळ स्वीकारून, आहे त्या आयुष्याला सामोरं जाणं हा पर्याय अनेकजणींनी आपल्या समाजात स्वीकारला. पण सिंधुताई मात्र यास अपवाद ठरल्या. प्राप्त परिस्थितीला शरण न जाता, आव्हान म्हणून त्यांनी आयुष्याकडे पाहिलं. समाजातील अन्यायग्रस्त स्त्रियांना आशेचा प्रकाश दाखवला. जीवनमान उंचावण्यासाठी आपणच स्वातंत्र्याचा जाणीवपूर्वक अवलंब करायला हवा, हे त्यांनी सिद्ध केलं. नवऱ्यानं नाकारून घराबाहेर काढल्यानंतर गाईच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. दगडानं तोडलेली नाळ आणि मुलीनं फोडलेला टाहो हे दोन्ही प्रसंग त्या शेवटपर्यंत विसरू शकल्या नाहीत.

पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहा दिवसांचं बाळ घेऊन त्यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यातूनच त्या अनाथांसाठी संस्था उभ्या करू शकल्या. आनंद, दुःख, अवहेलना, अपमान, उपेक्षा पचवत त्यांनी आश्रमात येणाऱ्या निराधार, गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची सोय पुरवली. सच्चाईनं काम करणाऱ्यांमागे पुरस्कारही आपोआप येतात. सिंधुताई सकपाळ यांच्या कार्याचा सर्वच स्तरातून गौरव करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -