
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुंबईत १ जानेवारीला करोना रुग्णसंख्या ६३४७ इतकी होती. ३ जानेवारीला हा आकडा ८०८२ इतका झाला होता. तर ५ जानेवारीला म्हणजे बुधवारी हा आकडा थेट १५१६६ इतका झाला होता. तर ६ जानेवारी म्हणजे आज मुंबईत एकाच दिवसात २०१८१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत दिवसाला २० हजार रुग्ण सापडल्यास लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच मुंबईतील रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
कालच्या २०,१८१ रुग्णांमुळे मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण ७९,२६० एवढे झालेत. बरे झालेले रुग्ण २,८३७ एवढे असून ४ मृत्यूची नोंद आहे तर मुंबईतील सील बंद इमारतींची संख्या ५०२ झाली आहे.
२५९ कर्मचाऱ्यांचा कोविडमुळे मृत्यू
कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या विविध खात्यातील २५९ अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांचा कोविड बाधा होऊन मृत्यू झाला आहे. २५९ पैकी २२२ कर्मचारी ,अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून उर्वरित ३७ मृत अधिकारी, कर्मचारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ६८ अधिकारी व कर्मचारी यांना कोविडची बाधा झाली असून त्यापैकी ६ हजार ५२९ अधिकारी, कर्मचारी हे यशस्वी उपचारानंतर कोविड मुक्त झाले आहेत. अद्यापही २८० कोविड बाधित कर्मचारी, अधिकारी उपचार घेत आहेत. या मृत २५९ मध्ये, संवर्ग 'अ' मधील ४, 'ब' मधील १३,'क' मधील ४४, 'ड' मधील १९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
..
१ जानेवारी ६,३४७
३ जानेवारी ८,०८२
५ जानेवारी १५,१६६
६ जानेवारी २०,१८१