Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाअविस्मरणीय : बांगलादेशचा न्यूझीलंडवर पहिला कसोटी विजय

अविस्मरणीय : बांगलादेशचा न्यूझीलंडवर पहिला कसोटी विजय

वेलिंग्टन : पहिली कसोटी ८ विकेटनी जिंकताना बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाहुण्यांचा जगज्जेते यजमानांवरील हा पहिलाच मालिका विजय आहे.

मध्यमगती गोलंदाज इबादत होसेनच्या दुसऱ्या डावातील ६ विकेट तसेच पहिल्या डावातील सलामीवीर महमुदुल हसन जॉय, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील अनुक्रमे नजमुल होसेन शांतो आणि कर्णधार मोमिनुल हक तसेच मधल्या फळीतील लिटन दासची दमदार अर्धशतके बांगलादेशच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

पहिल्या डावातील १३० धावांची आघाडीही पाहुण्यांसाठी जमेची बाजू ठरली. पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारणाऱ्या यजमानांची फलंदाजी दुसऱ्या डावात ढेपाळली. चौथ्या दिवसअखेर ५ बाद १४७ धावा करणाऱ्या न्यूझीलंडचा दुसरा डाव पाचव्या आणि अंतिम दिवशी १६९ धावांवर आटोपला. त्यांच्या तळातील पाच फलंदाजांना आणखी २२ धावांची भर घालता आली. इबादत होसेनने न्यूझीलंडचे शेपूट फार वळवळू दिले नाही. बुधवारी यजमानांचा डाव १०.४ षटके चालला. त्यानंतर बांगलादेशसमोर ४० धावाचे माफक लक्ष्य राहिले. पाहुण्यांनी सलामी जोडीच्या बदल्यात आव्हान पार केले.

दुसऱ्या डावात यजमानांना हादरवणारा इबादत होसेनला (एकूण ७ विकेट) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दुसऱ्या डावातील ४६ धावांतील ६ विकेट ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. विजयी सलामीसह बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघांमधील दुसरी आणि अंतिम कसोटी रविवारपासून (९ जानेवारी) ख्राइस्टचर्च येथे खेळली जाणार आहे.

ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्लूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली.
डब्लूटीसीमध्ये ३६ गुण असले तरी शंभर टक्के विजयांमुळे ऑस्ट्रेलिया संघ ताज्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. २४ गुण असलेला श्रीलंका संघ आणि ३६ गुण असलेला पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक ५३ गुण मिळवूनही ६३.०९ अशा टक्केवारीमुळे भारताने चौथे स्थान राखले आहे.

सलग १७ सामन्यांची विजयी मालिका खंडित
बुधवारच्या पराभवानंतर न्यूझीलंडची मायदेशातील सलग १७ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडला मालिका पराभव टाळण्यासाठी विजय आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -