फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा तातडीने वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तविक पाहता अठरा वय हे मुलींची विचारशक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शारीरिक, मानसिक परिपूर्ण वाढ पूर्ण होऊन त्या लग्नासाठी, त्या अानुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, संसारासाठी, कष्टाची कामे, घरकामे करण्यासाठी अथवा बाळाला जन्म देण्यासाठी परिपूर्ण तयार झालेल्या नसतात. आजही आपल्या समाजात मुली या कुटुंबाची जबाबदारी अथवा बोजा समजल्या जातात. त्यामुळे अनेक पालक केवळ मुलगी वयात आली म्हणून तिला जमेल त्या ठिकाणी, मिळेल त्या मुलाशी, समोरून मागणी आली म्हणून लग्न लावून देण्यात तत्परता दाखवतात. यावेळी मुलीला तिची पसंती कितपत विचारली जाते, हा तर प्रश्न आहेच; पण जरी तिने होकार दिला तरी तिला आयुष्यभराचा जोडीदार निवडण्याइतकी समज इतक्या कमी वयात असते की, केवळ दबावाखाली ती होकार देते, हा त्याहून गंभीर प्रश्न आहे.
केवळ मुलीच्या मागे अजून पाठच्या बहिणी, भावंडे आहेत म्हणून, अथवा आई-बाप मुलीला पुढे शिक्षण देण्यासाठी, सांभाळण्यासाठी आर्थिक सक्षम नाहीत म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्याच्या गळ्यात घालायचं काम पालक करताना दिसतात. मुलीची पुढे शिकायची इच्छा आहे का, ती लग्नाला मनापासून तयार आहे का, तिच्या आयुष्यात तिची काय ध्येय, स्वप्न, विचार, अपेक्षा आहेत, याकडे सर्रास दुर्लक्ष करून पालक मुलींना अक्षरशः अनेकदा बळजबरीने लग्न करायला भाग पाडतात. तरणीताठी मुलगी जास्त काळ आपल्याकडे राहणे म्हणजे जोखीम! उद्या तिचा पाय घसरला, तिनं काही प्रेमप्रकरण केलं किंवा ती कोणासोबत पळून गेली, किंवा कुठे फसली, लग्नाआधी गरोदर वगैरे राहिली, किंवा कुठल्याही चुकीच्या नादाला अथवा मार्गाला लागली अथवा समाजात तिच्या चारित्र्याबद्दल काही उलटसुलट चर्चा झाली, तर ‘घराची इज्जत’ जाईल; पुढे तिचं तर लग्न जमणारच नाही आणि पाठच्या भावाबहिणीच्या लग्नात देखील अडथळे येतील, भाऊबंध नावं ठेवतील, आपल्याशी संबंध तोडतील, अशी सर्वसाधारण विचारशैली पालक करतात.
अशा अतिशय कमी वय असलेल्या मुलींशी लग्नाला होकार देणारे, अथवा स्वतः मागणी घालणारी मुलं अथवा मुलाचे आई-वडील देखील काही खूप उदार मनाचे अथवा उच्च विचारसरणीचे असत नाहीत. कमी वयातील, फक्त दहावी-बारावी झालेली मुलगी लग्न करून आणताना त्यात बऱ्यापैकी स्वार्थ दडलेला असतो. घरात, शेतात राबायला हक्काची बाई म्हणून; आपला मुलगा हाताबाहेर जातोय, व्यसनाधीन होतोय, वाईट मार्गाला लागतोय, त्याची लक्षणं ठीक दिसत नाहीत, गळ्यात बायकोची जबाबदारी पडली की, बरोबर वठणीवर येईल, या विचारातून अशी लग्न केली जातात. अल्पवयीन मुलगी कमी शिकलेली असल्यामुळे आपल्यावर रुबाब करणार नाही, दबून राहील, ती काही नोकरी-व्यवसाय करू शकणार नाही, म्हणजे आर्थिक बाबतीत आपल्यावर अवलंबून असेल, त्यामुळे झुकून वागेल, कायम नमतं घेईल, असे विचार मनाशी धरूनच ही लग्नं जमवली जातात. मुळात अशा लग्नात मुलापेक्षा मुली खूप लहान असल्यामुळे, वयात जास्त अंतर असल्यामुळे त्यांना कायम दबावाखाली राहणे भाग पडते. आजही खेडोपाडी पालक अशिक्षित असल्यामुळे, मुलीकडील गरिबीची परिस्थिती असल्याकारणाने, घरात मुलींची संख्या जास्त असल्यामुळे, मुलीच्या शिक्षणाला जास्त काही महत्त्व नाही असे समजून, किंवा लहान वयात लग्न केलं, तर मुलगी सासरच्या घरात पटकन रुळते या समजुतीने, कायद्याचं कुठे घेऊन बसायचं खेडेगावात, कोण येतंय पाहायला, हातचं चांगलं स्थळ निघून जाऊ नये, या लालसेपोटी अशी लग्न लावण्यावर मुलींच्या पालकांचा भर असतो. सासरचे मुलीला पुढे शिकवणार आहेत, त्यांनी तसं कबूल केलंय; मुलबाळ काही लगेच होऊ देणार नाही, तसं बोलणं झालंय; ते तिला स्वतःच्या मुलीसारखंच वागवणार आहेत; तिला स्वयंपाक, घरकाम सगळं शिकवणार आहेत, सांभाळून घेणारे आहेत या मानसिकतेमधून मुलीला बोहल्यावर उभे केले जाते. एकदा लग्न लावून दिल्यावर मुलगी संसारात गुरफटल्यावर या आधी झालेली बोलाचाली सगळेच विसरून जातात आणि आपापल्या कामाला लागतात. या ठिकाणी मुलगी जर खरंच बौद्धिक पातळीवर हुशार असेल, तिला तिचे ध्येय असेल, करिअर करायची इच्छा असेल, तर तिचा प्रचंड कोंडमारा होतो आणि सातत्याने तडजोड करीत संसार रेटावा लागतो.