Thursday, October 30, 2025
Happy Diwali

शैक्षणिक सहलींना यंदाही पूर्णविराम

शैक्षणिक सहलींना यंदाही पूर्णविराम

पारस सहाणे

जव्हार : दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालयांना कोरोना साथीमुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष घरीच ऑनलाइन माध्यमातून पूर्ण झाले आहे. पहिली ते चौथी, त्याचबरोबर पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शाळा कोरोना ओसरल्यानंतर सुरू झाल्या आहेत. मात्र, यंदाही ओमायक्रॉनच्या भीतीमुळे शाळा-कॉलेजांच्या स्तरावर विविध शैक्षणिक व अभ्यास सहलींचे आयोजन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा यंदाही हिरमोड झाला आहे.


शाळा-कॉलेजांच्या स्तरावर विविध शैक्षणिक व अभ्यास सहलींचे आयोजन केले जाते. सदर सहलींमध्ये क्षेत्रभेटीसह मौजमजा व निसर्गरम्य ठिकाणी भेटी दिल्या जातात. निसर्गपर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. साधारणपणे दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर डिसेंबर जानेवारी महिन्यांमध्ये या सहलीआयोजित करण्यात येतात. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत चाललेल्या धोक्यामुळे यंदाही शैक्षणिक सहली थांबल्याच आहेत. त्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित असे कोणतेच संकेत दिलेले नाहीत. एकूणच सारी परिस्थिती पाहता शैक्षणिक सहलींना पूर्णविराम देण्यात आला आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.


शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच नवी ऊर्जा मिळावी म्हणून त्यांच्यासाठी क्षेत्रभेटी तसेच निसर्गरम्य ठिकाणे, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे आदी ठिकाणी सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट घोंघावत असल्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मुलांनी घरी राहूनच ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष पूर्ण केले.

दरम्यान, आता शाळा सुरू झाल्या असल्या, तरी ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दक्षता बाळगली जात आहे. एक ते दीड वर्षापासून घरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीचा आनंद कोरोनामुळे हिरावला गेला होता. मात्र, आता चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाचा जोर ओसरल्यामुळे शाळांच्या बरोबरच सहलीही सुरू होतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. परंतु, राज्यात वाढत चाललेल्या ओमायक्रॉनच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडले आहे.



पर्यटनस्थळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा


तालुक्यातील शाळांच्या सहलींसाठी धार्मिक, नैसर्गिक व पौराणिक स्थळे प्राधान्याने निवडली जातात. सहल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण विभागाकडून यंदा कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सध्या तरी ओमायक्रॉनमुळे सहलींना परवानगी दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आला, तरी सहली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वाट पाहावीच लागणार आहे.

Comments
Add Comment