Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

पुजाराच्या नावे विक्रम

पुजाराच्या नावे विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये ३० पेक्षा कमी सरासरी असूनही सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्याची करामत आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने साधली आहे. गेल्या १०० वर्षांत अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच फलंदाज आहे.

एका वर्षात ७०२ धावा

२०२१ मध्ये पुजाराने १४ कसोटी सामन्यांमध्ये २८.०८ च्या सरासरीने ७०२ धावा केल्या. त्याने सहा अर्धशतके केली, पण त्याचा स्ट्राइक रेट ३४.१७ होता. संथ खेळीमुळे त्याला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही पुजाराने पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात १६ धावा केल्या होत्या. तसेच जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याला फक्त तीन धावा करता आल्या होत्या.

१९५६ मध्ये पहिल्यांदा विक्रमाची नोंद

एखाद्या खेळाडूने ३० पेक्षा कमी सरासरीने धावा केल्याची आणि टॉप-५ मध्ये स्थान मिळवण्याची ही गेल्या १०० वर्षांतील दुसरी वेळ आहे. पुजाराच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज नील हार्वेने १९५६ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्या वर्षी हार्वेने २८.५० च्या सरासरीने ४५६ धावा केल्या होत्या. पण असे असूनही तो त्या वर्षी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज होता.

२०२१ मध्ये रूटने केल्या सर्वाधिक धावा

७०२ धावांसह पुजारा वर्षातील सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज होता. या यादीत इंग्लंडचा जो रूट १७०८ धावांसह अव्वल स्थानावर आहे. तर रोहित शर्मा ९०६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने ९०२ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि ऋषभ पंत ७४८ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
Comments
Add Comment