वसंत भोईर वाडा : तालुक्यातील नारे वडवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ‘सेंट गोबेन इंडिया’ (जिप्सम) या कंपनीतील कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, यासाठी कामगारांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र कंपनी प्रशासन हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी बुधवारी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. आत्मदहनाच्या तयारीत असताना पोलिसांनी १९ कामगारांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
वाडा तालुक्यातील नारे, वडवली या ग्रामपंचायत हद्दीत सेंट गोबेन इंडिया (जिप्सम) ही कंपनी असून या कंपनीत पीओपी पावडर व सीटचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीत अनेक स्थानिक कामगार काम करीत होते. कंपनी कोरोनाकाळात एक महिना बंद होती. त्यानंतर स्थानिक कामगारांना कामावर न घेता परप्रांतीय कामगारांची रिक्त झालेल्या जागी भरती केली. कामगार कंपनीच्या गेटवर गेल्यास तुम्हाला कामावर नंतर घेऊ, असे सांगितले जात होते. मात्र अनेक महिने उलटूनही कामावर घेतले जात नसल्याने कामगारांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करून कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर कंपनी प्रशासन, कामगार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक वाडा तहसीलदारांनी बोलवली. या बैठकीला कंपनी प्रशासनाचे अधिकारी न येता हा विषय तहसीलदारांच्या अखत्यारित येत नसल्याने आम्ही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे तहसीलदारांना कंपनीने एका पत्राद्वारे कळवले. त्यानंतर कामगारांचा विषय तसाच पडून आहे.
कामगारांना न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी बोईसरचे कामगार आयुक्त व वाडा तहसीलदार यांना निवेदन देऊन १५ डिसेंबर २०२१पर्यंत काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घ्या. अन्यथा, आत्मदहन करू, असा इशारा कामगारांनी निवेदनाद्वारे दिला होता. अखेर आज कामगार तहसीलदार कार्यालयासमोर जमले. त्यानंतर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी १९ कामगारांना ताब्यात घेतले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली.