Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी

आंदोलकांनी रस्ता अडवल्याने ताफा अडकला; पंजाब दौरा अर्धवट सोडून मोदी माघारी

फिरोजपूर : पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी दौरा अर्धवट सोडला. सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट झाले आहे.

‘पंतप्रधान मोदी बुधवारी त्यांच्या नियोजित फिरोजपूर दौऱ्यासाठी रवाना झाले. भठिंडा येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. तिथे हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र परिसरात पाऊस असल्याने व कमी दृष्यमानता असल्याने पेच निर्माण झाला. साधारण वीस मिनिटे तिथे पंतप्रधानांनी प्रतीक्षा केली. त्यानंतर रस्ते मार्गाने हुसैनीवाला येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याने साधारण दोन तासांचे हे अंतर होते. या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत लगेचच पंजाबच्या पोलीस महासंचालकांना अवगत करण्यात आले.

मात्र, शहीद स्मारकाच्या ३० किलोमीटर अलीकडे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला. काही आंदोलकांनी रस्ता रोखल्याने तेथील एका उड्डाणपुलाजवळ १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी थांबून होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर चूक लक्षात घेत तातडीने तिथून भठिंडा येथे परतण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केले आहे.

पंतप्रधानांचा दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम आणि प्रवासाचे नियोजन याबाबत आधीच पंजाब सरकारला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सुरक्षा व अन्य व्यवस्था होणे अपेक्षित होते. पंतप्रधान रस्तेमार्गे जाणार हे निश्चित झाल्यावर या मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र, तशी व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळेच याबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागवण्यात आला असून पंतप्रधानांच्या सुरक्षेत कुचराई करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही गृहमंत्रालयाने राज्य सरकारला सांगितले आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळला आरोप भाजपने पंजाब सरकारला फटकारले असून पंतप्रधानांना पुरेशी सुरक्षा पुरवू न शकणाऱ्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी केली आहे. मात्र चन्नी यांनी आरोप फेटाळले आहेत. पंतप्रधान हवाईमार्गे येणार होते. मात्र आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे ही सुरक्षेतील चूक म्हणता येणार नाही, असे चन्नी म्हणाले.

 किमान जिवंत तरी… विमानतळावर पोहोचलो

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -