जोहान्सबर्ग : दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
२ बाद ८५वरून भारताने दुसऱ्या डावात बुधवारी २३९ धावांची मजल मारली. त्याचे क्रेडिट चेतेश्वर पुजारा (५३ धावा)आणि अजिंक्य रहाणे (५८ धावा) या सीनियर्ससह अष्टपैलू हनुमा विहारी (नाबाद ४० धावा) तसेच शार्दूल ठाकूरला (२८ धावा) जाते. दक्षिण आफ्रिकेने बोनस म्हणून दिलेल्या ३३ अवांतर धावा भारताला अडीचशेच्या घरात पोहोचवण्यास मोलाच्या ठरल्या.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. पुजाराला दुसऱ्या डावात अखेर सूर गवसला. त्याने अर्धशतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील त्याचं ३२ वं अर्धशतक आहे. त्यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेने अर्धशतकी पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली आहे. शतकी भागीदारी फोडण्यात कागिसो रबाडाला यश आलं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तीन चेंडू खेळून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लुन्गी एन्गिडीच्या गोलंदाजीवर अश्विन झेलबाद झाला. आर. अश्विन १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने झटपट खेळी करत २४ चेंडूंत २८ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र मार्को जॅन्सेनच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराच्या रुपाने भारताना नववा धक्का बसला आहे. बुमराहने १४ चेंडूंत ७ धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराजही खातेही उघडू शकला नाही. अष्टपैलू हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून रबाडासह एन्गिडी तसेच जॅन्सेनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र, यजमान गोलंदाजांनी ३३ धावांचा बोनसही दिला. त्यात १६ बाइजसह ८ नोबॉल आणि ५ वाइड चेंडूंचा समावेश आहे.
पहिल्या डावात भारताने २०२ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघाने २२९ धावा केल्या आणि २७ धावांची आघाडी घेतली होती.