Wednesday, July 9, 2025

नवी मुंबईत थंड वातावरणात कोरोनाची धास्ती

नवी मुंबईत थंड वातावरणात कोरोनाची धास्ती
नवी मुंबई (प्रतिनिधी) :नवी मुंबईत मागील तीन दिवसांत दोन हजारच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच थंडीचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला व ताप आल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

ताप, सर्दी व खोकला झालेल्या रुग्णांची अँटीजन, आरटीपीसीआर तपासणी केली, तर काहींची चाचणी सकारात्मक येत आहे, तर काही रुगांना जरी सर्दी, ताप व खोकल्यासारखी व्याधी असली तरी त्यांची कोरोनाच्या संसर्गाची तपासणी ही नकारात्मक येत आहे. पण कोरोनाचे सावट नवी मुंबईवर असल्याने नागरिकांच्या मनात भीती दिसून येत आहे.

सोमवारपासून बुधवारपर्यंत जवळ-जवळ दोन हजार कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. मनपाच्या रुग्णालयात डॉक्टरांना तपासणीच्या आधी चाचणी तर करावीच लागते. त्याशिवाय रुग्णाला केसपेपर मिळत नाही, हे जरी खरे असले तरी थंडीच्या कालावधीत उपलब्ध होणारे आजार हे सर्वसामान्य आहेत. नवी मुंबईत खासगी रुग्णालयांत देखील रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. अँटीजन चाचणीचा अहवाल तत्काळ येत असल्याने काही रुग्णांच्या तोंडावर हसू, तर काही रुग्ण निराश दिसत आहेत.
Comments
Add Comment