
पुणे : 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी सिंधूताई यांना हार्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजारावरील उपचारासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.