डहाणू : डहाणू-चिंचणी-वाढवण समुद्रकिनारे पर्यटनस्थळे घोषित करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्र्यांनी पर्यटन स्थळांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून त्या दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटनस्थळांचा विकास करून देशाबरोबरच परदेशी पर्यटकही या ठिकाणी येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्या परिसरात सोयी-सुविधाही निर्माण होतील.
त्यादृष्टीने डहाणूला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यातील डहाणू नगर परिषद हद्दीतील समुद्रकिनारा आणि बोर्डी येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे दररोज पर्यटकांची तुफान गर्दी असते. मात्र चिंचणी आणि वाढवण या गावचा स्वच्छ, सुंदर आणि सुरुच्या बागांनी आच्छादलेला समुद्रकिनाऱ्यावरही रोज हजारो पर्यटक येत असतात. वाढवणच्या नैसर्गिक वैभव प्राप्त असलेल्या या सर्वांग समुद्र, स्वच्छ किनाऱ्यावर आणि पुरातन काळापासून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, समुद्रात खुद्द प्रभू श्रीरामाने आपले पिता दशरथ यांचे पिंडदान केले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
त्यामुळे तेथे आप्तेष्टांचे पिंडदान करण्यासाठी दररोज लांबवरून लोक येत असतात. अशी चिंचणी आणि वाढवण ही दोन्ही नयनरम्य ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे आवश्यक आहे. या ठिकाणी समुद्रही खोल असल्याने बोटिंगही करता येणे शक्य आहे. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने या दोन्ही किनाऱ्यांची पाहणी करून योग्य त्या सुविधा निर्माण करून दिल्यास पर्यटन मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल व रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. यासाठी सरकारने ही दोन्ही ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून घोषित करावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.