मुंबई :भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच अनुषंगाने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.
युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्लू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
तसेच दुर्मीळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.
या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.
असा आहे चित्ररथ
– दर्शनी बाजूस भव्य ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती
– दीड फूट दर्शविणारे राज्यफूल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ आणि त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा
– १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी
– कास पठाराची प्रतिमा
– दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा
– चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा