कोरोनाच्या विषाणूचा पुन्हा एकदा विळखा महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला पडू लागला आहे. ‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन का?’ या प्रश्नाने राज्यातील सारी जनता अस्वस्थ झाली आहे. ‘कोरोनोची तिसरी लाट’ हे शब्द ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा आलाय. ओमायक्रॉन किती जणांवर आक्रमण करणार आणि किती जणांचे बळी घेणार, याचा अंदाजही अजून कुणाला आलेला नाही. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या भयानक संकटापुढे जनतेचा तरी काय दोष? प्रशासन आणि सरकारी यंत्रणा जसे सांगेल तसे निमूटपणे वागायचे, एवढेच प्रत्येकाच्या हातात असते. कोरोना आणि ओमायक्रॉन विरोधात चालू असलेल्या लढाईत सर्वात जास्त हाल होतात ते लहान मुलांचे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेतला.
सर्व जगात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. भारतासारख्या विशाल देशात लसीकरण मोहीम राबविणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण आपल्या देशात जवळपास दीडशे कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत. देशातील सर्वांना लसीची दुसरी मात्रा मिळालेली नाही, हे वास्तव असले तरी दुसरी मात्रा देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मोदी सरकारने भाजप व बिगर भाजप सरकार असा कोणताही भेदभाव न राखता, प्रत्येक राज्याला लस आणि औषधे पुरेशा प्रमाणात पुरविण्याचे काम केले आहे. मुलांना लस देण्यासाठी प्रथम वय वर्षे पंधरा ते अठरा गटातील मुलांना प्राधान्य देण्याचे सरकारने ठरवले. अशा मुलांची संख्या देशात दहा कोटी असावी. या सर्वांना लस देणे हे सुद्धा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. पण मुलांचा उत्साह आणि लसीकरण मोहिमेसाठी करण्यात आलेले नियोजन, यामुळे पहिल्या दोन दिवसांत विक्रमी लसीकरण झाले. १ जानेवारीपासूनच लसीकरण नोंदणीला जोरदार सुरुवात झाली. लस घेण्यासाठी मुले व त्यांचे पालक खूप उत्सुक आहेत, हेच त्याचे कारण आहे. महाराष्ट्रात साडेसहाशे लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून साठ लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पावणेदोन लाख मुलांचे लसीकरण झाले व पुढील २८ दिवसांत नऊ लाख मुलांचे लसीकरण करणे लक्ष्य ठरवले आहे.
मुलांचे लसीकरण ही काळाची गरज आहे. गेली दोन वर्षे कोरोना व लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेजेस बंद होती. बालवाडी आणि पहिलीत गेलेल्या मुलांना तर शाळा कशी असते, ते गेल्या दोन वर्षांत बघायलाही मिळालेले नाही. ज्यांनी शाळा बदलल्या किंवा नव्या शाळांमध्ये प्रवेश घेतला, त्यांनाही आपल्या नवीन शाळांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. शाळा, क्लासरूम, टीचर्स रूम, लायब्ररी, कार्यक्रमांचे हॉल, मैदाने, खेळाची साधने, ड्रॉइंग रूम, कॅन्टीन हे सर्व शाळा-कॉलेजचे वैभव गेली दोन वर्षे निपचित पडलेले आहे, त्याचा आनंद मुलांना लुटता आलेला नाही. शालेय जीवनाच्या आनंदापासून सर्व वयोगटातील मुलांना कोरोनाच्या विषाणूने तोडले आहे. दिवाळीपासून जरा कुठे शाळा सुरू होणार, असे वातावरण तयार झाले तोच पुन्हा तिसऱ्या लाटेचे आक्रमण सुरू झाले आणि शाळा बंदचे फतवे सरकारकडून निघू लागले.
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई हे तर कोरोनाचे व ओमायक्रॉनचे हॉटस्पॉट ठरले आहेत. दोनही महानगरांत बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईमधील ९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. अंगात ताप नाही, डोके दुखत नाही, कणकण नाही, अंग दुखत नाही, खोकला नाही, कफ तर नाहीच तरीही कोविड-१९ची चाचणी केल्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो, हे न उलगडणारे कोडे आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत रोज सात ते आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यांच्यात ठोस लक्षणे नसल्याने त्यांना घरीच उपचार व विलगीकरण करण्यास सांगण्यात येत आहे. मुंबईत जवळपास बत्तीस हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. पण जेमतेम साडेतीन हजार खाटांवर रुग्ण असून बाकीच्या खाटा रिकाम्या आहेत. रोज वीस हजारांपेक्षा जास्त बाधित रुग्ण सापडू लागले, तरच या महानगरात लॉकडाऊन जारी करण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. आपणा सर्वांच्या सुदैवाने आणि ईश्वरी कृपेने अशी पाळी मुंबईवर येऊ नये, हीच आमची इच्छा आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या फेऱ्यांत सापडू नये, असे प्रत्येकाला वाटते. लॉकडाऊनमध्ये बंद झाल्यावर कसा त्रास होतो, हे सर्वांनी अनुभवले आहे. पश्चिम बंगालसह देशातील अर्धा डझन राज्यांमधे लॉकडाऊन जारी झाला. पंजाबसह काही राज्यांत नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दिल्लीला वीकेन्ड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. एम्समधील डॉक्टरांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ ५० टक्के केंद्रीय कर्मचाऱ्यांनीच कामावर हजर राहावे, असा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. देशातील तेवीस राज्यांत कोरोनाची लागण पसरली आहे. केंद्राचे व राज्याचे अनेक मंत्री तसेच सर्वपक्षीय असंख्य आमदार-खासदार कोरोनाबाधित झाले आहेत. शाळा पुन्हा ऑनलाइनकडे वळू लागल्या आहेत. गेल्या दोन लाटेत झालेल्या चुका सुधारून तिसऱ्या लाटेला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सहकार्य व एकजूट कायम राखणे गरजेचे आहे.