Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडीपालघर

जिल्ह्यामध्ये दिवसभरात आढळले ५२६ रुग्ण

जिल्ह्यामध्ये दिवसभरात आढळले ५२६ रुग्ण पालघर : गेल्या २४ तासांत पालघर जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून तब्बल ५२६ रुग्ण सापडले. त्यापैकी ४५० रुग्ण वसई-विरार शहर मनपा, तर ७६ पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. ज्या वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरतोय त्या तुलनेत जिल्हा व मनपाच्या वैद्यकीय यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून येत नाही. मीरा-भाईंदर, वसई-विरार या दोन महानगरपालिका, पालघर, डहाणू, जव्हार नगर परिषदा व वाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी व मोखाडा या चार नगरपंचायती क्षेत्रांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा व मनपा प्रशासनाला कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही. आठवडे बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी काही दिवस हे आठवडे बाजार बंद ठेवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच मासळी व भाजीपाला मार्केटमध्ये मनपा प्रशासनाने मार्शल तैनात करून कठोर उपाययोजना करावी. अन्यथा, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे. सध्या मनपा क्षेत्रात मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, जमावबंदीचे सर्रास उल्लंघन करणे असे प्रकार नित्यनेमाने घडत आहेत. मनपाने यावर उपाययोजना करण्यासाठी मार्शल्सची कुमक तैनात करणे गरजेचे आहे. विरार व नालासोपारा पूर्व भागात खबरदारीचे उपाय योजल्यास प्रादुर्भावाचा वेग काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

कोरोनाचे सारे नियम धाब्यावर - सुनंदा लेले, बोळींज, विरार (प.)

बोलींज परिसरात प्रभाग समितीच्या प्रवेशद्वारावरच गर्दी पाहावयास मिळते. कोरोनाचे सारे नियम धाब्यावर बसवून नागरिक सकाळी ९.०० ते १२.०० वाजेपर्यंत तोंडाला मास्क न लावता फिरत असतात. त्यामुळे या भागांसह आगाशी व अर्नाळा भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत.

परिसर सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर वसला आहे.

संतोष भुवन,धानिव, धानिवबाग या गजबजलेल्या गावांमध्ये गेल्या चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. पण त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कुठेच दिसत नाही. त्यामुळे हा परिसर सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर वसला आहे. - रेखा शर्मा, गृहिणी, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व
Comments
Add Comment