Tuesday, August 5, 2025

पावसामुळे ४३ षटकांचा खेळ वाया

पावसामुळे ४३ षटकांचा खेळ वाया

सिडनी (वृत्तसंस्था): अॅशेस क्रिकेट मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. ओले मैदान तसेच अंधुक प्रकाशामुळे ४३ षटकांचा खेळ वाया गेला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १२६ धावा केल्यात.



पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवशी आघाडी फळीचे संयमी योगदान आणि दोन अर्धशतकी भागीदाऱ्या हे यजमानांच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अनुभवी डेव्हिड वॉर्नरने (३० धावा) मार्कस हॅरिससह (३८ धावा) ऑस्ट्रेलियाला ५१ धावांची दमदार सलामी दिली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला बाद करताना सलामी फोडली. त्यानंतर हॅरिसने मॅर्नस लॅबुशेनला (२८ धावा) हाताशी धरून यजमानांचे शतक फलकावर लावले. मात्र, तिसऱ्या सत्रात हे दोन्ही स्थिरावलेले फलंदाज बाद करण्यात अनुक्रमे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वुडला यश आले.



तत्पूर्वी, यजमान कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पावसामुळे उशीराने खेळ सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. मात्र, पाचव्या षटकात पावसामुळे खेळ थांबला. त्यानंतर उघडीप मिळाल्याने पुन्हा खेळाला सुरुवात झाली. परंतु, पाऊस पुन्हा प्रकटला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १३.३ षटकांत बिनबाद १३ धावा झाल्या होत्या. पाऊस कायम राहिल्याने त्याच वेळी उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला.




Comments
Add Comment