महाड : राज्यात कोरोना आणि नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. रायगडमध्ये गेल्या २४ तासांत ७०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाड तालुक्यातील एका शाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या शाळेतील १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि तालुक्याचे आरोग्य प्रशासन हादरले आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला होता. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. मंगळवारी, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. जिल्ह्यात ७०२ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यातील ५२१ रुग्ण एकट्या पनवेलमधील आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. असे असतानाच, रायगडमधील महाड तालुक्यातील एका शाळेतही कोरोनाने शिरकाव केल्याने धास्ती वाढली आहे. महाडमधील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या शाळेतील एका विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. त्यात एकूण १७ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोणामध्येही लक्षणे आढळून आलेली नाहीत. सर्व जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, शाळांमध्ये विद्यार्थी बाधित होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. सर्वांनी अधिक काळजी आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.