मुंबई : सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्विनीची पोस्ट
‘अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस? पोस्ट नाही केलीस ? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. ‘, असं तेजस्विनीनं पोस्टमध्ये लिहिले आहे.
तसंच तेजस्विनीने पोस्टमधून सांगितल्या माईंसोबतच्या आठवणी. पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिले, माई आणि मी रोज संपर्कात नव्हतो .पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं.
मी सिंधूताई सपकाळ या सिनेमानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस!’