Wednesday, September 17, 2025

शाळेतील सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा जारी

शाळेतील सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा जारी

नवी दिल्ली : लहान मुलांच्या आरोग्यासाठी शाळेत होणाऱ्या सूर्य नमस्काराला मुस्लिमांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा जारी करत मुस्लीम विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतीक देश आहे. याच सिद्धांताच्या आधारावर आपले संविधान लिहिण्यात आले आहे. शाळांचे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक चर्चांमध्ये देखील याचे भान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

संविधान आपल्याला याची परवानगी देत नाही की, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धर्माची शिकवण दिली जावी किंवा विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारे समारंभांचे आयोजन केले जावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण सध्या सरकार संविधानाच्या या नियमापासून दूर चालली आहे. तसेच देशातील सर्व वर्गातील बहुसंख्याकांचा धार्मिक विचार आणि परंपरा थोपण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे यावरुन दिसून येतेय की, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 30 राज्यांमध्ये सूर्य नमस्कार अभियान राबवण्याची योजना आखली आहे. यामध्ये 30 हजार शाळांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 या काळात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 26 जानेवारी रोजी सूर्य नमस्कारावर एक सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण हे असंविधानिक कृत्य असून देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. कारण सूर्य नमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक भाग आहे. पण इस्लाम आणि देशातील इतर अल्पसंख्यांक सूर्याला देव मानत नाहीत आणि त्याची उपासनाही करत नाहीत. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि धर्मनिरपेक्ष मुल्यांचे पालन करावे, असे या फतव्यात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment