Sunday, October 26, 2025
Happy Diwali

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना कोरोनाची लागण

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशात ओमायक्रोन वेरियंटच्या संसर्ग वेगाने सुरू असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नमुन्याचा रिपोर्ट येण्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 'मी कोविड पॉझिटिव्ह आढळलो आहे. सौम्य लक्षणे आहेत. मला घरी आयसोलेट करण्यात आले आहे, असे सांगत केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांत आपल्याला भेटलेल्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 'गेल्या काही दिवसांत जो कोणी आमच्या संपर्कात आला, कृपया त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून आपली चाचणी करून घ्यावी', असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सध्या निवडणुकांसाठी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. निवडणुकांच्या जाहीर कार्यक्रमांबाबत ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. पंजाब, गोवा, उत्तराखंड या विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये त्यांचे सतत दौरे सुरू आहेत. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनहून ते सोमवारीच दिल्लीला परतले. यादरम्यान ते मोठ्या संख्येने नागरिकांच्या संपर्कात आले असावेत.

आम आदमी पक्षाच्या (आप) डेहराडूनमधील परेड ग्राउंडवर झालेल्या उत्तराखंड नवनिर्माण सभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थिती लावली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आपला पक्ष सत्तेत आल्यास उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाची रक्कम म्हणून एक कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. केजरीवाल यांनी ३४-३५ वयोगटातील निवृत्त सैनिकांना थेट नोकऱ्या देण्याचे आणि त्यांच्या देशभक्तीचा, लष्करी पराक्रमाचा आणि शिस्तीचा पुरेपूर वापर करून नवीन उत्तराखंडच्या उभारणीत त्यांना भागीदार बनविण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. केजरीवाल यांनी प्रचारसभेत उपस्थिती लावल्यामुळे चिंता वाढली आहे. कारण यातूनच अनेकांना संसर्ग होण्याची भीती आहे.

दरम्यान, दिल्लीतील एम्सने डॉक्टरांच्या उर्वरीत हिवाळी सुट्ट्या रद्द केल्या आहेत. ५ ते १० जानेवारीदरम्या या सुट्ट्या होत्या. सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment