नवी दिल्ली (हिं.स.) : इस्लामिक स्टेट ऑफ इजिप्त एन्ड सिरीया (इसीस) दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी, ३ जानेवारी रोजी कर्नाटकचे काँग्रेस नेते बी. एम. इदिनाब्बा यांची नातसून दीप्ती मारला हिला अटक केली आहे. आरोपी दीप्ती ही इदिनाब्बाचे नातू अब्दुल रहमान याची पत्नी आहे.
एनआयएने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने इसीसशी संबंध असल्याप्रकरणी दीप्ती मारला उर्फ मरियम, अनस अब्दुल रहिमान यांना अटक केली असल्याचे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे. अनस अब्दुल रहिमान हे मारला यांचे पती आणि बी.एम. बाशा यांचे चिरंजीव आहेत, बाशा यांचे वडील इदिनाबा एकेकाळी काँग्रेसचे आमदार होते. त्यांचे २००९ मध्ये इदिनाब्बा यांचे निधन झाले आहे. तसेच यापूर्वी एनआयएने याप्रकरणी अनसचा भाऊ अममार याला अटक केली होती.
तपासादरम्यान, हे उघड झाले आहे की सीरिया/इराकमध्ये इसीसच्या पडावानंतर दीप्ती मारला आणि मोहम्मद आमीन हिजराह साठी तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्च २०२० मध्ये काश्मीरला भेट दिली होती. मोहम्मद आमीनसह दीप्ती मारला ही आयएसआयएसच्या कटाची मुख्य सूत्रधार होती, असे एनआयएने म्हटले आहे. आत्तापर्यंत, एनआयएने आतापर्यंत ११ लोकांना निधी गोळा करणे, प्रशिक्षण देणे आणि लोकांना इसीसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे या आरोपाखाली अटक केली आहे. गेल्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी, जम्मू-कश्मीर आणि कर्नाटकमधील पाच ठिकाणी शोधमोहिम राबवण्यात आली आणि इस्लामिक स्टेटसाठी निधी गोळा करणे आणि भरती केल्याच्या आरोपाखाली अम्मारसह चार लोकांना अटक केली.
केरळच्या कासारगोडा येथील १३ जण २०१६ मध्ये देश सोडून इसीसमध्ये भर्ती होण्यासाठी गेले होते. त्यामध्ये अम्मारच्या भाचीचा देखील समावेश होता. जानेवारी २०१७ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात एनआयएने अजमला आणि तिचा पती शिफास केपी हे बेंगळुरू येथून भारत सोडून गेल्याचा संशय व्यक्त केला, तसेच ते २४ मे २०१६ रोजी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आयएस मध्ये सामील झाले. सूत्रांनुसार आतापर्यंत एकूण २१ लोकांनी इसीस मध्ये भर्ती होण्यासाठी केरळ सोडले असल्याचे समोर आले आहे.
एनआयएने गेल्या वर्षी ५ मार्च रोजी आयपीसी आणि यूएपीए कायद्याच्या विविध आरोपाखाली ७ ज्ञात आणि इतर अनोळखी लोकांविरुद्ध स्वतःहून गुन्हा नोंदवला होता. मोहम्मद अमीन आणि त्याचे सहकारी आयएस विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि सदस्यांची भरती करण्यासाठी टेलिग्राम, हूप आणि इंस्टाग्राम सारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचार चॅनेल चालवत असल्याचा आरोप आहे.