Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अमेरिकेत एका दिवसात १० लाख ४२ हजार नवे रुग्ण

अमेरिकेत एका दिवसात १० लाख ४२ हजार नवे रुग्ण

वॉशिंग्टन : कोरोनाचा आतापर्यंत सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आताही ओमायक्रॉनमुळे अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आतापर्यंत जितक्या लाटा झाल्या त्यापेक्षा तीनपट वेगाने रुग्णांची नोंद आता अमेरिकेत होत आहे. सोमवारी दिवसभरात अमेरिकेत १० लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सोमवारी सायंकाळी जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने डेटा जारी केला आहे. यानुसार रविवारच्या तुलनेत सोमवारी १० लाख ४२ हजार नवे रुग्ण नोंद झाले.

अमेरिकेत ३० डिसेंबरला जवळपास सहा लाख रुग्ण होते. त्यानंतर ३१ डिसेंबरला हीच आकडेवारी साडेचार लाखांपेक्षा कमी झाली. तर १ जानेवारीला दीड लाख रुग्ण आढळले होते. त्यानंतर २ जानेवारीला २ लाख ८६ हजार नवे रुग्ण आढळले होते. मात्र ३ तारखेला अचानक रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन आकडा १० लाखांवर पोहोचला.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस हे मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाव्हायरस रिस्पॉन्स टीमसोबत बैठक घेण्यात येणार आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने सोमवारी फायजरच्या बायोएनटेकचा कोरोना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. १२ ते १५ वर्षांच्या मुलांना हा डोस देता येणार आहे.

अमेरिकेशिवाय जगातील इतर देशांमध्येही कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. फिजीच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या देशात ओमायक्रॉनचं कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याचं सांगितलं. ५८० नवे रुग्ण आणि २ मृत्यू झाल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. तर इस्रायलमध्ये दर आठवड्याला ५० हजार रुग्ण आढळू शकतात अशी शक्यता इस्रायलच्या आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्लीसह अनेक राज्यात नाइट कर्फ्युसह इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात सलग दोन दिवस ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर ओमायक्रॉन बाधितांची संख्या १९०० पेक्षा जास्त झाली आहे.

Comments
Add Comment