Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडावाँडरर्स स्टेडियम भारतासाठी ‘लकी’

वाँडरर्स स्टेडियम भारतासाठी ‘लकी’

जोहान्सबर्ग (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी सोमवारपासून (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळली जाणार आहे. विजयी सुरुवातीनंतर आत्मविश्वास उंचावलेला पाहुणा संघ सातत्य राखताना तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यास उत्सुक आहे.

वाँडरर्स स्टेडियमवर झालेल्या आजवरच्या पाच सामन्यांत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यातील दुसरा विजय हा २४ जानेवारी २०१८मधील आहे. तीन सामने अनिर्णित राहिलेत.

सेंच्युरियनवर झालेल्या पहिल्या (बॉक्सिंग डे) कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवून भारताने दौऱ्याची सुरुवात सनसनाटी केली. आता आव्हान सातत्य राखण्याचे आहे. भारताची सांघिक कामगिरी उंचावली तरी आघाडीच्या फळीतील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा फॉर्म चिंतेची बाब आहे. वेगवान माऱ्यामध्ये मोहम्मद शमीसह जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजने छाप पाडली तरी चौथा गोलंदाज मुंबईकर शार्दूल ठाकूर प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह खेळायचे की नाही, हा प्रश्न भारताच्या संघ व्यवस्थापनासमोर आहे.

पिछाडीवर पडलेल्या यजमानांसमोर सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याचे आव्हान आहे. फलंदाजी ढेपाळली असतानाच अनुभवी क्विंटन डी कॉकच्या निवृत्तीने त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कर्णधार डीन एल्गरने थोडा प्रतिकार केला तरी अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरताहेत. डुआने ऑलिव्हर हा फिट असल्याने गोलंदाजीत एक पर्याय उपलब्ध आहे. द. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आणि लुन्गी एन्गिडीने थोडा प्रभाव पाडला तरी अन्य गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बवुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कॅगिसो रबाडा,सॅरेल इर्वी, ब्युरॉन हेंड्रिक्स, जॉर्ज लिन्डे, केशव महाराज, लुन्गी एन्गिडी, आयडन मर्कराम, विआन मुल्डर, एन्रिच नॉर्किया, कीगॅन पीटरसन, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, काइल व्हेरीन्नी, मार्को जॅन्सेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रीनेलेन सुब्रायन, सिसान्डा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.


कोहलीला फलंदाजीतील विक्रमाची संधी

३२ वर्षीय विराट कोहलीला वाँडरर्समध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज बनण्याची संधी आहे. या मैदानावर २ कसोटीत त्याने ३१० धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा माजी फलंदाज जॉन रीडला मागे टाकण्यासाठी त्याला फक्त ७ धावांची गरज आहे. रीड हा ३१६ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

२०१३मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जोहान्सबर्ग कसोटीत विराटने पहिल्या डावात ११९ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने ९६ धावा केल्या होत्या. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. २०१८ मध्ये, कोहलीने पहिल्या डावात ५४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ४१ धावा करत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

द्रविड यांनाही मागे टाकणार?

विराट कोहलीलाही विद्ममान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा विक्रम मोडण्याला वाव आहे. भारतीय म्हणून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने ११ सामन्यात ६२४ धावा केल्या आहेत, तर कोहलीने ६ कसोटी सामन्यात ६११ धावा केल्या आहेत.

वेळ : दु. १.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -