Tuesday, June 17, 2025

जिल्ह्यात सर्वत्र किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाचा शुभारंभ

जिल्ह्यात सर्वत्र किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाचा शुभारंभ

पालघर : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास आजपासून सुरुवात झाली असून चहाडे येथील स्वर्गीय श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पालघर पं. स. सभापती रंजना म्हसकर, जि. प. सदस्य नीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपूर या १५ वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीस लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
शाळा आणि महाविद्यालयापासून लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील एकूण १ लाख ६८ हजार ९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली.



सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा शुभारंभ होत असून ही आनंदाची गोष्ट आहे. आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल, असे मत यावेळी अध्यक्ष वाढाण यांनी व्यक्त केले. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे असून लसीकरणाबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नका, असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून कोरोनाची तिसरी लाट आपण थोपवू शकतो, असा विश्वास व्यक्त करून रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळा आणि कुठल्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैदेही वाढाण यांनी केले.



लहानपणी जे लसीकरण झाले आहे त्याचाच हा भाग असून आता कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.



यानंतर मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे, अशा सूचना अध्यक्ष वाढाण यांनी केल्या. यावेळी चहाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.



Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा