Tuesday, July 1, 2025

आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण

आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण

ठाणे (वार्ताहर) : मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात दहा केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी दहाच्या सुमारास वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात येणार आहे.


जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील आनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment