वाडा : तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांपूर्वी परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला, तर गेल्या मार्च महिन्यामध्ये वाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात त्याचे रूपांतर करण्याची मंजुरी मिळाली. मात्र एवढा प्रदीर्घ काळ उलटला असतानाही या दोन्ही रुग्णालयांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे सरत्या वर्षातही चांगली आरोग्य सेवा आदिवासी व गोरगरीब जनतेला मिळाली नाही.
सन १९६० साली त्यावेळच्या लोकसंख्येचा विचार करून ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले होते. आता ६१ वर्षानंतरही हे रुग्णालय जसेच्या तसेच आहे. त्यात काही प्रमाणात बदल झाला असला तरी लोकसंख्या आता चार-पाच पटींनी वाढली आहे. त्यामुळे ३० खाटांचे रुग्णालय अपुरे पडत होते. वाडा हे पालघर, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने विक्रमगड तालुक्यातील मलवाडा, वसुरी मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ, शहापूर तालुक्यातील अघई आणि भिवंडी तालुक्यातील अंबाडी या परिसरातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात दररोज ३०० ते ३५०च्या आसपास बाह्यरुग्णांची तपासणी व उपचार केले जातात. तसेच प्रत्येक महिन्याला ८० ते ९० प्रसुती होतात. मात्र गुंतागुंतीच्या प्रसुतीसाठी महिलांना ठाणे व मुंबई येथील रुग्णालयात जावे लागते.
दरम्यान वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हे रुग्णालय अपुरे पडत होते. गेल्या काही वर्षांपूर्वी तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने त्यामुळे कामा-धंद्यानिमित्त हजारो कामगारांनी परप्रांतातून येऊन वास्तव्य केले आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयात एक पुरुषकक्ष व एक महिलाकक्ष असे दोन कक्ष आहेत. पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यामुळे रुग्णांचा अतिरिक्त भार रुग्णालयावर पडतो. रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडतात. अशावेळी रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागतात. त्यातच सर्पदंश, विंचुदंश, गॅस्ट्रो अशा रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याशिवाय, येथील महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्याही मोठी आहे. त्याचाही ताण रुग्णालयावर पडत आहे.
वाडा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, यासाठी गेल्या ३० वर्षांपासून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या मागणीला अखेर यश आले असून वाडा ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता गेल्या मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारने दिली. मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
तसेच अतिदुर्गम भागातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी घेतल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर झाले. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आदिवासी भागांमध्ये सर्वाधिक कुपोषण व बालमृत्यूंचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे साथीचे रोग, सर्पदंशाचे प्रमाण अधिक असल्याने रुग्णांना उपचारासाठी वाडा अथवा ठाणे-मुंबईला जाणे भाग पडत होते. म्हणून या परिसरात ग्रामीण रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.
विधिमंडळाच्या अनुसूचित जनजाती समितीचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांनी परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालय करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. त्यावर तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडेही अनेक बैठका झाल्या होत्या.
दरम्यान आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मान्यता दिल्याने परळी येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली. मात्र अद्यापही सदर मंजुरी कागदावरच दिसत असून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय ‘जैसे थे’च असल्याने आदिवासी व गोरगरीब जनतेला चांगल्या
आरोग्यसेवेचे स्वप्न कागदावरच दिसत आहे.