वाडा :राज्य सरकारने आजपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरुवात केली असून आज चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात विशेष कार्यक्रमाने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगून अफवांवर विश्वास न ठेवता १५ ते १८ वयोगटातील सर्वांनी कोविड लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, पंचायत समिती सदस्य राजेश सातवी, कुडूस विभाग शिक्षण सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, डॉ. निकिता पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान तालुक्यात किशोरवयीन मुले-मुली दहा हजारांच्या आसपास असून येत्या पंधरा दिवसांत सर्वांचे लसीकरण केले जाईल. आज सोमवारी चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात ३००, वाडा शहरातील पी. जे. विद्यालयात ३००, तर कंचाड येथील सरस्वती विद्यालयात ३०० मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.