Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीपोलिसाचा विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार

पोलिसाचा विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार

धमकी देऊन संमतीशिवाय सहा वर्षे शारीरिक संबंध

देवा पेरवी 

पेण : पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेशी तिच्या संमतीशिवाय मागील सहा वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलिसांनी आरोपी शाम जाधव याला अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अलिबाग येथील मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव (रा. शिवाजी नगर, रामवाडी, पेण) याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहित महिलेशी तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन २०१५ पासून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार या महिलेने पेण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केली. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस शाम जाधव याच्या विरोधात भा.द.वि. कलम ३७६ (१), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शाम जाधव याला पेण पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीसाने केली पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण आरोपी शाम जाधव याच्या विरोधात सदर महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता या महिलेची फिर्याद ऐकून घेत असताना आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणीही आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.द.वि. कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माथेरानमध्ये पत्रकारासोबत दादागिरी

दरम्यान, श्याम जाधव पाच महिन्यांपूर्वी माथेरान पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना रात्रीच्या वेळेत टपरी बंद झाल्यानंतर पान दिले नाही म्हणून टपरी मालकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. यावेळी सदर वाद सोडवण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांच्यासोबतही दादागिरी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -