मुंबई : आपल्या देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसी देणारा पहिला देश असल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये ‘फ्लोरोना’ नावाच्या नवीन संकटाने डोके वर काढले आहे. ‘फ्लोरोना’चा अर्थ होतो कोरोना आणि इन्फ्लूएन्झाचा एकाच वेळी संसर्ग होणे. येथील एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी कोरोना आणि इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झालेला रुग्ण ही एक गरोदर महिला आहे.
राबीन मेडिकल सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे. या महिलेचे लसीकरण झालेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला कोरोना आणि इन्फ्लूएन्झा या दोन्हींची लस देण्यात आलेली नाही. इस्रायलमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता सरकारने आपल्या नागरिकांसाठी चौथ्या डोसची तयारी पूर्ण केली असून लसीकरणाचा सुरुवातही झाल्याची माहिती समोर येत आहे.