Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

पूर्णिमा शिंदे

सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरात ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. नेवसे पाटील यांचे घराणे ऐतिहासिक परंपरा लाभलेले महान घराणे. या घराण्यातील सुंदर सुपुत्री म्हणजेच सावित्रीबाई होत. या अतिशय गुणसंपन्न, सुसंस्कृत, सुंदर होत्या. अनेक स्थळे चालून आली होती. त्याचवेळी जोतिबा फुले यांचेही स्थळ आले. जोतिबांचे वय तेरा वर्षं आणि सावित्रींचे वय नऊ वर्षांचे होते. इ.स.१८४० रोजी नायगाव येथे मोठ्या थाटामाटात यांचा विवाह झाला. सद्गुणांच्या बाबतीत दोघं ही समसमान. दोन सुस्वरूप, गुणी, कर्तृत्ववान दिव्य शक्ती यांचा मिलाफ. दोन व्यक्तींचा मिलाफ म्हणजे फुले दाम्पत्याचा युगप्रवर्तक क्रांतिकारी शुभारंभच.

तत्कालीन काळ यवनांच्या अत्याचाराचा काळ, पडदा पद्धती, अमानुष चालीरीती अशा परिस्थितीत सर्वप्रथम आपल्या पत्नीस शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचे स्वप्न साकारणारे महात्मा जोतिबा फुले थोर समाज सुधारक. त्यांच्या मते शिक्षणाशिवाय समाजात कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही. सामाजिक उद्धार, प्रबोधन जनजागृती निर्माण व्हावी म्हणून म. जोतिबा फुलेंनी सावित्रीबाईस साक्षर केले. पहिली भारतीय थोर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे कार्य महनीय आहे.

सत्य, समता व मानवतेचा युगप्रवर्तक, प्रखर ज्योती, क्रांतीज्योती एक प्रज्वलित स्वयंसिद्धा, स्त्री-पुरुष समानतेचा लढा देणाऱ्या, स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या, सत्यशोधक, समाजसुधारक, क्रांतिकारी, स्त्री शिक्षणाच्या निर्मात्या, बालहत्या प्रतिबंधक, लिंगभेदाच्या विषमतेच्या दरीस त्याकाळी मिटवून स्त्रीमुक्ती देणाऱ्या, दूरदृष्टीच्या प्रगत,आद्य क्रांतिकारक, स्त्री, शूद्रातीशूद्र निराधारांची, अनाथांची माय होत्या. तत्कालीन समाजामध्ये पुरुष आणि स्त्री विषमता होती, हे दोन्ही मानवप्राणी एकाच ईश्वराची लेकरं असून ती दोन्ही सारख्या योग्यतेची आहेत. स्त्रीला असे गुलामगिरीत जखडून ठेवले, तर तिलाही बुद्धी, भावना, पुरुषाप्रमाणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. पुरुषाप्रमाणे विद्या हे तिच्या विकासाचे, जागृतीचे प्रभावी साधन आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी याच धर्तीवर शिक्षण परिवर्तनाने आपल्या अलौकिक क्रांती कार्याचा आरंभ केला. सावित्रीबाईंसमवेत स्त्री शिक्षणाच्या ज्ञानज्योती उजळल्या. स्त्री आणि पुरुष संसार रूपी गाड्याची दोन चाके असून एक लहान तर दुसरे मोठे असून चालणार नाही. एक मोटार गाडीचे तर दुसरे खटारागाडीचे असेल तर तो गाडा नीट कसा चालणार? म्हणूनच स्त्री शिक्षणाला महात्मा फुलेंनी सर्वश्रेष्ठ स्थान दिले आणि प्रथम स्वतःच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन साक्षर, विचारी, सक्षम समाज उद्बोधक बनविले. म. फुले यांच्या सर्व क्रांतिकार्याचे केंद्र पुणे होते. पुण्यातच प्रथम त्यांनी भिडे वाड्यात इ.स १८४८मध्ये मुलींची शाळा सुरू केली. आदर्श पती तर होतेच, तसेच आदर्श गुरुही होते. महात्मा फुले यांच्या तालमीत तयार झालेल्या सावित्रीबाई जिद्दी, करारी आव्हाने पेलणाऱ्या, आदर्श समाजसेविका, युगप्रवर्तक ठरल्या. ऐहिक सुखापेक्षा जगाचा संसार पत्करला, शिक्षणाचा वसा उचलला. हाल-अपेष्टा, छळ, निंदा-नालस्ती, शिव्याशाप, संकटे, अपमान यांना सामोरे गेल्या. जोतिबा हे सावित्रीची प्रेरणा होते आणि सावित्री ही जोतिबांची प्रेरणा होत्या, हे जगाच्या संसाराचे समीकरण होते.

फुले कालीन समाज हा आर्थिक, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीत खितपत पडलेला. अशा अवस्थेत या उभयतांनी तत्कालीन मागासलेल्या समाजाला, अखिल मानव जातीला नवसंजीवनी दिली. शैक्षणिक कार्याची महत्त्वाची जबाबदारी सावित्रीबाईंनी सांभाळली. गोरगरिबांना, शूद्रातीशूद्रास मोफत शिक्षण, शेतकऱ्यांच्या शिक्षणाचे महान कार्य त्यांनी केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुनर्वसनासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह इ.स. १८७३ साली स्थापना करून परित्यक्ता, विधवा, निराधार महिलांना संगोपन, शिक्षण, पुनर्वसन केले. आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या एका विधवेस आपल्यासमवेत आणून गर्भवती विधवा काशीबाईस घरी आणून सावित्रीबाईंनी नाळ कापली, तिला मुलगा झाला. त्या मुलास या उभयतांनी आपले मानून काशीबाईचे मूल दत्तक घेऊन डॉक्टर केला तो यशवंता.

सावित्रीबाईंनी तत्कालीन अडचणींतून मार्ग काढता येतो, हा नवा विचार दऊन शैक्षणिक क्रांती घडविली. पिचलेल्या मनाला, शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी पदर खोचून त्या उभ्या राहिल्या. शिक्षण क्षेत्रातील थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, संशोधिका ठरल्या. सावित्रीबाई संवेदनशील मनाच्या कवयित्री होत्या. बालहत्या प्रतिबंधक गृहातील मुलांची सेवा अविरतपणे वात्सल्याने करीत. लालन-पालन ,संगोपन शिक्षण ,दयाळू ,उदात्त कळवळ्याने करत.

दुष्काळाचे सावट…

इ.स. १८७६मध्ये भीषण दुष्काळ पडला. अशावेळी या उभयतांनी अहोरात्र, मिळेल तेथे अन्नधान्य जमवून ठिकठिकाणी अन्नछत्रे उभारली. ती चालविण्याची अवघड आणि महत्त्वाची जबाबदारी सावित्रीबाईंवर आली. ती त्यांनी जिकरीने पार पाडली. सत्यशोधक समाजामार्फत सत्यशोधक समाजाची स्थापना करून अन्नछत्रे उघडून २००० मुला-मुलींची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली, हा कारभार देखील सावित्रीबाई पाहत होत्या. केशवपन व सतीची चाल या दोन्ही व अमानुष अनिष्ट रूढी याच काळात बोकाळल्या होत्या. एकोणिसाव्या शतकात अकाली वैधव्य आलेल्या बालिकेला या दुःखात न्हाव्यासमोर बसून केशवपनाद्वारे विद्रूप बनविले जाई. एखाद्या बालिकेचा पती निधन पावल्यास तिला त्याच्या चितेवर जिवंत ढकलण्यात येई. या अघोरी कृत्यांना आळा घालण्यासाठी या उभयतांनी अतोनात प्रयत्न केले. स्त्रीवर्गाची अवहेलना, छळ, विटंबना, बेअब्रू थांबविण्यासाठी मुंबई-पुणे परिसरातील नाभिकांची परिषद भरविली. या कुकर्मापासून अन्याय, अत्याचाराचा परिणाम किती घातक, दाहक आहे, समजावून देतानाच निष्पाप, दुर्बल स्त्रियांचे केस कापू नयेत, अशी विनंती नाभिकांना केली. याची जाणीव होऊन हा प्रकार ताबडतोब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते सारे संपावर गेले.

‘सावित्रीबाईंनी वैयक्तिक संसारापेक्षा, ऐहिक सुखापेक्षा शिक्षणाचा, लोककल्याणाचा, विश्व जगताचा संसार केला. आपल्या परमप्रिय पतीसह आनंद, सन्मान तर प्राप्त केला तसाच छळ व निंदा यातही त्या वाटेकरी झाल्या. परोपकार, सत्कार्य, समाजप्रबोधन आणि चळवळीचे क्रांतिकार्य केले. १८९० मध्ये महात्मा फुले यांची प्राणज्योत मालवली. परंतु दुःखातही पुनश्च जिद्द व धैर्याने या सत्यशोधक समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. १८९० ते १८९७ या काळात हे कार्य त्यांनी नेटाने चालू ठेवले. पण त्यातच प्लेगच्या साथीचे थैमान सुरू झाले. १८९७ साली महाराष्ट्रात महामारी आली. गावेच्या गावे उठली. माणसे दगावली. पुणे जिल्ह्यात सत्यशोधक समाजाने आपले सेवाकार्य अविरत सुरुच ठेवले. सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतच्या दवाखान्यात पुष्कळ रोगी उपचारादरम्यान बरे केले. दुर्दैवाने या सेवा-सुश्रुषा देतादेता स्वतः सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. सेवा करता करता त्यांनाही मृत्यूने कवटाळले.

इ.स १८९७ साली शिक्षण क्रांतीची तेजस्वी मशालज्योत विझली. पण तिच्या अलौकिक, प्रतिभावान कार्यरुपाने ती अजरामर, देदीप्यमान तेवती ठरली. अनेक सावित्रीच्या लेकी तुमच्या-आमच्या रूपाने शिक्षणाचा वसा व वारसा घेत आहेत. बुद्धिमान लेखिका, प्रतिभासंपन्न शिक्षिका, संवेदनशील कवयित्री, युगप्रवर्तक, क्रांतिकारी समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, प्रगल्भ विचारधारा, करुणा, दूरदृष्टी, समता, विश्वबंधुत्व, सहिष्णुता, सुसंस्कृतपणा, स्त्रीमुक्तीच्या आंदोलक, दीनदुबळ्यांची माय,अनाथांचा आधारवड, अलौकिक अविस्मरणीय तेजस्विनी, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना लक्ष लक्ष त्रिवार अभिवादन आणि त्यांच्या प्रेरणादायी,अलौकिक कार्याला शतशः प्रणाम.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -