उल्हासनगर (वार्ताहर) : अंबरनाथच्या डीएमसी कंपनीच्या आवारात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रवी तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील बंद पडलेल्या डीएमसी कंपनीचे बोराक्स पावडर साठवण केंद्र होते. त्या ठिकाणी परिसरातील युवक क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना डोक्यात दगड घातल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह दिसला.
त्यांनी तत्काळ वॉचमनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या नावाने अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.