नाशिक : ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट थोपवण्यासाठी राज्य सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करत असले तरी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. शाळा, महाविद्यालयातील वाढता संसर्ग प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. नगर, पुण्यानंतर आता नाशिकच्या पंचवटी येथील केबीएच दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १७ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक महापालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी ही माहिती दिली आहे. वसतिगृह व्यवस्थापनाने शनिवारी ५२ विद्यार्थिनींच्या स्वॅबचे नमुने घेतले होते. चाचणीत यातील १७ मुली पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यानंतर आज लगेचच महापालिकेच्या पथकाने जाऊन संबंधित वसतिगृहाची पाहणी केली. कोरोनाबाधित आढळलेल्या १७ विद्यार्थिनींना वसतिगृहातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गरज भासल्यास या सर्व विद्यार्थिनींना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी सांगितले. ‘मुलांच्या वसतिगृहातही अशाच प्रकारे तपासणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांच्या अहवालाबाबत माहिती मिळालेली नाही. मुलांच्या चाचणीचे अहवाल आज येण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नाशिकमध्ये ६९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी ग्रामीण भागांत २३२ रुग्ण आहेत तर महापालिकेच्या हद्दीत ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात दहा रुग्ण आहेत तर जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा यात समावेश आहे.