Saturday, April 26, 2025
Homeमहत्वाची बातमीवचन दिलेत तेव्हापासून घरांचा मालमत्ता कर माफ करा

वचन दिलेत तेव्हापासून घरांचा मालमत्ता कर माफ करा

मुंबई : आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखेपासून ५०० चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा, अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी, आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई”करां”ची आठवण झाली असा टोलाही लगावला आहे.

मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, या निर्णयाला एवढा उशीर का झाला? गेली चार वर्षे का निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आतापासून नको तर मागिल चार वर्षांचा कर ही मुंबईकरांना परत करा. जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासूनची करमाफी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, मुंबईतील अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं ५०० चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही ५०० चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा. म्हणजे ज्या मध्यमवर्गीय मुंबईकरांची घरे ६००, ६५०, ७०० चौरस फुटाची आहेत त्यांचाही ५०० चौरस फुटापर्यंत कर माफ करा व त्यापेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळाचाच कर त्यांना आकारण्यात यावा. यासोबतच ५०० चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांनाही हीच सुट देणार का? ज्यांचा मुंबईत फुलांचा, भाजीचा, केशकर्तनालय, फळविक्री सारखा व्यवसाय करणारा छोटा व्यापारी आहे, त्याच्या गाळ्याचा ५०० चौ. फुटापर्यंतचा कर माफ करा, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली आहे.

सरकारने विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचा समाचार घेताना आमदार शेलार पुढे म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सुट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली.. मग मुंबईकरांच्या निर्णयाला का विलंब झाला? आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -