
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णसंख्येत २१ टक्के इतकी वाढ झाली असून २७ हजार ५५३ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. त्याचवेळी २८४ रुग्णांना कोरोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉनचा धोकाही वाढत चालला असून एकूण रुग्णसंख्येने आता दीड हजारचा टप्पा ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या १ हजार ५२५ वर पोहचली आहे.
गेल्या २४ तासांतील कोरोना व ओमायक्रॉनची आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली असून हे आकडे चिंतेत अधिकच भर घालणारे ठरले आहेत. सध्याची स्थिती पाहता मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा प्रमुख महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसत आहे.
देशात गेल्या २४ तासांत तब्बल २७ हजार ५५३ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली असून जवळपास तीन महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ८०१ इतकी झाली आहे. २४ तासांत आणखी २८४ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता ४ लाख ८१ हजार ७७० इतका झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता दीड हजारच्या पुढे गेली आहे.
देशात ओमायक्रॉनचे आतापर्यंत १ हजार ५२५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५६० जण उपचारांनंतर बरे झाले असून अन्य रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक ४६० रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील १६० रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. त्यानंतर दिल्लीत ३५१ ओमायक्रॉन बाधित आढळले असून त्यातील ५७ रुग्ण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये १३६, तामिळनाडूत ११७ तर केरळमध्ये ओमायक्रॉनचे १०९ रुग्ण आहेत. आतापर्यंत २३ राज्यांत ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक २१ रुग्ण गुजरातमध्ये आढळले.