नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात, शहरात कोरोनामुळे विविध ठिकाणांवर प्रतिबंध लादण्यात आले आहेत. त्यात राज्य शासनाने उद्यानाच्या वेळेवर देखील प्रतिबंध लादले आहेत. याचा फटका लहानग्यांना बसला असून उद्यानात प्रवेशावर प्रतिबंध आल्याने नियमित ऐकण्यास येणारा किलबिलाट आता नवी मुंबईत थांबलेला दिसून येत आहे. त्यामुळे बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.
कोरोना विषाणूने लहान मुलांचा आनंदही हिरावून घेतला आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये धमाल करणाऱ्या मुलांना यंदाच्या सुट्ट्या देखील गेल्यावर्षी प्रमाणे घरातच घालवाव्या लागतील का, असा प्रश्न पालकांना सतावू लागला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून राज्य शासनाच्या आदेशानुसार सायंकाळी पाच नंतर उद्यान बंद करण्याचे आदेश आले. त्याची अंमलबजावणी मनपा प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील उद्याने ओस पडली असून उद्यानातील किलबिलाट व खेळाच्या साहित्यावर तुटून पडणारी बच्चेकंपनी दोन दिवसंपासून घरातच होमक्वारंटाइन झाल्याने उद्यानातील झोक्याचा किरकिर आवाजच बंद पडला असल्याचे वास्तव दिसून येत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उद्याने सकाळी साडे पाच ते दहापर्यंत खुली ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. तर दुसरीकडे लहान मुलांसाठी असणारी खेळणी मात्र बंदीस्त करून बांधून ठेवण्यात आली आहेत.
नवी मुंबई परिसरात दोनशेहून अधिक उद्याने मनपाने विकसित केली आहेत. उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळण्याकरिता खेळणी बसविण्यात आली आहेत. त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे बांधण्यात आली आहेत. उद्यानात सावलीसाठी झाडे तसेच बसण्याकरिता सिमेंटची आसने लावण्यात आली आहेत. मात्र उद्याने कोरोनामुळे ओस पडली आहेत. सर्व उद्याने निर्मनुष्य झाली आहेत.
लहान मुलांनी खास करून संध्याकाळचा वेळ उद्यानातील खेळण्यांसोबत खेळण्यासाठी राखून ठेवला होता, मात्र कोरोनामुळे तोही घरातच घालवा लागतो आहे. अनेक लहान मुले उद्यानातील बंदिस्त केलेली खेळणी बघून धाय मोकलून रडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शासनाच्या आदेशाने कार्यवाही केली जात आहे. मुलांचा आनंद हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, पण दुर्दैवी घटना घडण्याच्या अगोदर तत्परता दाखविणे गरजेचे आहे. चांगली वेळ आल्यावर सर्व काही चांगले होईल. – जयदीप पवार, उपायुक्त, उद्यान विभाग