Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

पुलाचा कठडा तोडून ट्रक हवेत लोंबकळला

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरमधील बावनदी पुलावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र अपघात घडला. तीन ट्रक आणि कार यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातून एक ट्रकचालक बचावला. हा अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून ट्रकचा पुढचा भाग हवेत लोंबकळत होता. त्यात असलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तब्बल पाच तासांनंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास वाहनांचा अडथळा दूर केल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, एक जण जखमी झाला. मारुती जानू पाटील (वय ५५, रा. पाचुंबरे, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अमोल जगदीश केसरकर (वय ३१, रा. मोरवे खंडाळा, जि. सातारा) यांनी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ते ट्रक, आणि जनार्दन जयवंत शेळके हे दुसरा ट्रक घेऊन निवळी ते साताऱ्याकडे जात होते. त्याचवेळी मारुती पाटील हा ट्रक घेऊन मुंबईहून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने आला.

बावनदीच्या ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर मध्यभागी ही वाहने आली असता, मारुती पाटील याचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रकची धडक प्रथम जनार्दन शेळके चालवत असलेल्या ट्रकला बसली. नंतर त्या पाठोपाठ येणार्‍या अमोल केसरकर याच्या ट्रकलाही धडकला. त्यामुळे केसरकर यांचा ट्रक मागे जाऊन तिरका फिरला. पुलाच्या मध्यभागी येऊन पुलाचा कठडा या ट्रकने तोडला. ट्रकचा पुढील भाग हा पुलाबाहेर लोंबकळत होता. सुदैवाने यातील चालक बचावला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. केसरकर यांच्या ट्रकच्या मागून येणाऱ्या कारलाही या ट्रकची धडक बसून नुकसान झाले. त्यामधील प्रवासी अर्शिया सोहेल मणेर (वय २६, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) ही जखमी झाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात मारुती पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -